पुणे, 24 जुलै : पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरी आलेले पार्सल घेण्यास नकार दिल्यानंतर ते जबरदस्तीने घरात येऊन देण्यात प्रयत्न करण्यात आला. या कारणामुळे एका डिलिव्हरी बॉयवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण - फिर्यादी 36 वर्षीय महिला ही बावधनमधील पाटीलनगर मध्ये राहतात. त्यांना तीन वर्षाची मुलगीही आहे. मुलगीही त्यांच्यासोबत राहते. तसेच त्या एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतात. घटस्फोटासाठी त्यांचा आणि त्यांच्या पतीमध्ये न्यायालयात वाद सुरू आहे. याचदरम्यान, त्यांचे अॅमेझान कंपनीचे पार्सल आले आहे, असा फोन त्यांना सिक्युरिटी गेटवरुन आला. तर यावेळी त्यांनी आपण कोणतेही पार्सल मागविले नाही, असे सांगितले. तर इतकेच नव्हे कोणालाही घरात पाठवू नका, असेही सांगितले. घरात घुसण्याचा डिलिव्हरी बॉयचा प्रयत्न - मात्र, यानंतर काही वेळाने एक जण वर आला. त्याने त्यांच्या घराची बाहेरील कडी काढली आणि आतील कडी काढू लागला. यादरम्यान, महिलेने दरवाजाचे आतील लॉक लावून पुन्हा गेटवरील सुरक्षारक्षकाला फोन लावला आणि याबाबत विचारले. तर त्याने आपण ओळखीचा आहे, असे सांगून आत गेल्याचे सिक्युरिटीने सांगितले. यानंतर फिर्यादी यांनी आरडा ओरडा केली आणि बाजूच्या लोकांनी येऊन या डिलिव्हरी बॉयला पकडले. यानंतर पोलिसांना बोलावले. हेही वाचा - पुणे : पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचे हाल; गुप्तांगावर व्होलीनी स्प्रे मारला, नंतर… डिलिव्हरी बॉयची चौकशी केली असता, तो म्हणाला की, या महिलेच्या पतीने आपल्या मुलीच्या नावाने एक पार्सल पाठविले होते. मात्र, त्या घेत नसल्याने परत घेऊन जाण्याऐवजी त्याने घरात डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पती पत्नीच्या भांडणात डिलिव्हरी बॉयवर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.