पाटणा, 14 मे : अलीकडच्या काळात वाढदिवस, लग्न समारंभांचं स्वरूप बदलल्याचं दिसून येतं. खरंतरं हे आनंदाचे क्षण पाहुणेमंडळी, कुटुंबियांसोबत साजरे करायचे असतात. पण आता हे समारंभ गुन्ह्याचं (Crime) कारण ठरु लागले आहेत. वाढदिवसाच्या दिवशी तलवारीनं केक कापणं, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणं, विवाहसोहळ्यात, वरातीत क्षुल्लक कारणावरून वाद-विवाद, हाणामारी करणं, बंदुकीतून हवेत गोळीबार करणं असे प्रकार वाढताना दिसत आहेत. असाच एक प्रकार बिहारमधल्या (Bihar) खगरिया जिल्ह्यात घडला. विवाहाची रिसेप्शन पार्टी (Reception Party) सुरू असताना वधूचा (Bride) भाऊ बंदूक (Gun) घेऊन आला. त्यानं ही बंदूक वधूच्या म्हणजेच बहिणीच्या हातात दिली. वधूनंदेखील न घाबरता बंदूक हातात घेऊन आनंदाच्या भरात गोळीबार (Firing) केला. या प्रकारामुळे समारंभाच्या ठिकाणी काहीवेळ स्तब्धता पसरली. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral) झाला असून, आता हे प्रकरण पोलिसांत गेलं आहे. 'आज तक'ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
एखाद्या विवाह सोहळ्यात पुरुषांनी उत्साहाच्याभरात बंदुकीतून हवेत गोळ्या झाडल्याच्या आपण अनेक घटना पेपरमध्ये वाचतो किंवा सिनेमात अशी दृश्य पाहतो. पण बिहारमधल्या खगरिया जिल्ह्यातल्या भरतखंड सहाय्यक पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या मुस्लिम टोला परिसरात एक वेगळाच प्रकार घडला. इंजिनीअर मोहम्मद असिफ (Mohammed Asif) यांच्या नववधूने स्टेजवरच गोळीबार केल्याने समारंभाला आलेले लोक क्षणभर स्तब्ध आणि आश्चर्यचकीत झाले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात या प्रकरणाची माहिती घेतली आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
(जळगावात दूध फेडरेशनबाहेर तुफान राडा, टँकर चालकाचा मृतदेह आणून नातेवाईकांचा ठिय्या)
याबाबत भरतखंड सहाय्यक पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडिओ मुस्लिम टोला भागातला आहे. रिसेप्शन पार्टीवेळी उत्साहाच्याभरात गोळीबार करण्यात आला. वधूच्या हातात बंदूक देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. या प्रकरणी वधूसोबत तिच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून, पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत.
भागलपूर जिल्ह्यातल्या नारायणपूर येथील रहिवासी असलेले मोहम्मद असिफ हे राजस्थानच्या (Rajasthan) सार्वजनिक आरोग्य विभागातल्या इंजिनीअरिंग डिपार्टमेंटमध्ये (PHED) इंजिनीअर म्हणून कार्यरत आहेत. मोहम्मद असिफ यांचा या महिन्यात बिहारमधल्या खगरिया जिल्ह्यात बलहा गावात विवाह झाला. 10 मे रोजी वधूच्या बहिणीच्या घरी विवाहानिमित्त रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत वधूचं संपूर्ण कुटुंब सहभागी झालं होतं. त्यावेळी वधूच्या भावानं तिच्या हातात बंदूक देत गोळीबार करण्यास प्रवृत्त केलं. मोहम्मद यांच्या नववधूने स्टेजवर केलेला हा गोळीबाराचा प्रकार पाहून उपस्थित पाहुणे आश्चर्यचकीत झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Viral video.