मुंबई, 14 जून : बँक मॅनेजरच्या पत्नीने सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. महिलेचा आक्रोश ऐकून परिसरातले लोक इमारतीखाली जमा झाले, यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांना घरामध्ये एक चिठ्ठीही सापडली आहे. आपल्यासाठी हे पाऊल उचलणं सोपं नव्हतं, असं तिने चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. उज्जैनच्या नीलगंगा भागात मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या भागातली सगळ्यात उंच बिल्डिंग असलेल्या शिवांश एलिगेन्सच्या बी ब्लॉकच्या सहाव्या मजल्यावरून 30 वर्षांच्या महिलेने उडी मारली. महिला डोक्यावर पडल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. पडल्यानंतर महिलेचा आवाज ऐकताच बिल्डिंगचे रहिवासी खाली उतरले. बिल्डिंगचे रहिवासी आणि वॉचमनने महिलेला ऍम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलला घेऊन गेले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना घरात चिठ्ठी मिळाली. कौटुंबिक वादामुळे महिलेने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच पुढची माहिती समोर येईल. मिळालेल्या माहितीनुसार महिलेचं माहेर इंदूरच्या देपालपूरमधील हातोद आहे. महिलेचा पती उज्जैन जिल्ह्याच्या घट्टिया भागातील युको बँकेत मॅनेजर आहे. सहाव्या मजल्यावरून उडी मारलेली शिल्पा खासगी नोकरी करत होती. घटनेनंतर महिलेच्या माहेरची माणसंही घटनास्थळी पोहोचली. महिलेच्या घरात एक चिठ्ठी सापडली आहे. ‘माझ्यासाठी हे अजिबात सोपं नव्हतं. खूप प्रयत्न केला, तुम्हाला यामध्ये कुटुंबाला आणायची गरज नव्हती. माझी कोणाबद्दलही तक्रार नाही. तुम्हाला माझ्याबद्दल असेल तर मला माफ करा, मिस यू, शिल्पा….’ असं या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे. उज्जैनचे सीएसपी सचिन परते यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचं नाव शिल्पा आहे. 2 वर्षांपूर्वीच शिल्पाचं मोहितसोबत लग्न झालं होतं. मोहित उज्जैनच्या बँकेत मॅनेजर आहे. मोहित आणि शिल्पा या बिल्डिंगच्या बी ब्लॉकमध्ये 604 नंबरच्या अपार्टमेंटमध्ये 7 महिने आधी राहायला आले होते. या दोघांनाही मुल नव्हतं. महिलेकडे चिठ्ठी मिळाली आहे, ज्यात कौटुंबिक कलहाचं कारण समोर आलं आहे. या चिठ्ठीचा तपास फिंगरप्रिंट एक्सपर्टकडून करण्यात येणार आहे. तसंच ही हत्या तर नाही ना? याचाही तपास केला जाणार आहे. या घटनेवेळी महिलेचा पती घरात होता, त्यामुळे त्याचीही चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.