रूपेश कुमार भगत, प्रतिनिधी गुमला, 29 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या मेहुणीवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही धक्कादायक घटना झारखंड राज्यातील गुमलाच्या टोटाम्बी इथे घडली. एका व्यक्तीने आपल्या मेहुणीवर जीवघेणा हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. अंजिता कुमारी असे या तरुणीचे नाव आहे. तर सीताराम उरांव असे आरोपीचे नाव आहे. जखमी तरुणीला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले.
इथे प्राथमिक उपचारानंतर तिला रांची येथील रिम्स रुग्णालयात रेफर करण्यात आले. इथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर या घटनेनंतर आरोपी फरार आहे. अंजिता कुमारी या आठवडी बाजारात सामान विक्रीसाठी आली होती. सामानाची विक्री झाल्यावर ती रेशन दुकानावर माल घेत होती.
यावेळी आरोपी मेहुणा सीताराम उरांव हा कुऱ्हाड घेऊन तिथे पोहोचला आणि त्याने आपल्या मेहुणीवर वार केले. यात ती जखमी झाली. यानंतर त्याने तिथून पळ काढला. याबाबत अधिक माहिती मिळाली की, सीताराम याचे आपली पत्नी सुनिता देवीसोबत पटत नाही आहे. तो आपल्या पत्नी आणि मुलांना मारहाण करतो. त्यामुळे त्रासलेल्या सुनीताने आपल्या मुलांसह माहेरी धाव घेतली आहे. तसेच आता सासरी न येण्याची भूमिका तिने घेतली आहे. यातूनच आरोपीने आपल्या बायकोच्या बहिणीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. सध्या तो फरा असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकारी अमित कुमार चौधरी यांनी सांगितले आहे.