प्रयागराज, 16 एप्रिल : अतिक अहमद आणि अशरफ या दोघांच्या हत्येनं प्रयागराजसह देशभरात खळबळ माजली आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तातही दोघांची हत्या झाल्यानंतर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं जात आहे. दरम्यान, अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांबाबत माहिती समोर आली आहे. गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ यांची हत्या करणाऱ्यांमध्ये लवलेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी नावाचा तरुण आहे. लवलेशचे वडील यज्ञ तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना मुलाशी आमचा कसलाच संबंध नसल्याचं सांगत अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या. लवलेशच्या वडिलांनी म्हटलं की, त्याच्याशी आमचं काही देणं-घेणं नाही. तो कधीतरी घरी यायचा. पाच सहा दिवसांपूर्वी घरी आला होता. आमच्याशी फारसं बोलत नव्हता. तो नशा करायचा आणि काहीच काम करत नव्हता. अतिक हत्याकांडात असल्याची माहिती टीव्हीवरून समजल्याचं ते म्हणाले. गँगस्टर अतिक अहमद याची हत्या, पोलिसांसमोरच हत्येचा LIVE VIDEO अतिक अहमदच्या हत्येच्या घटनेनंतर आम्हाला काळजी वाटत आहे. आम्हाला त्याच्याबद्दल माहितीच नव्हतं. टीव्हीवरून समजलं. लवलेशनं इंटरपर्यंतच शिक्षण घेतलंय. एका प्रकरणात तो तुरुंगातही गेला होता. जवळपास दीड वर्षे मुलगा तुरुंगात होता असंही लवलेशच्या वडिलांनी सांगितलं. प्रयागराजमध्ये अतिक अहमदला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ जागीच ठार झाले. या प्रकरणी हल्लेखोरांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तिघांकडूनही वेगवेगळी उत्तरे दिली जात असल्याचं समजते. हत्या का केली या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, आपली दहशत पसरवण्यासाठी त्यांनी अतिक आणि अशरफला मारण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. मात्र अद्याप पोलिसांकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.