प्रियांक सौरव, मुझफ्फरपूर : सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, वाढती गुन्हेगारी या सगळ्यामुळे अनेकांची मानसिकता बदलते आहे. समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची संख्या वाढते आहे. माणसातला हैवान जागा झाला, की त्याला चांगल्या-वाईटाची काहीही शुद्ध राहत नाही. अशाच प्रकारची एक घटना बिहारमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे लष्करातल्या एका व्यक्तीने हे कृत्य केलं आहे. बिहार राज्यात मुजफ्फरपूरमध्ये ही वेदनादायी घटना घडली आहे. अहियापूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या बडा जगन्नाथ परिसरात ही घटना घडली आहे. प्रगतिनगर बडा जगन्नाथ परिसरात राहणाऱ्या विपीन शर्मा यांचा मुलगा हिमांशू शर्मा लष्करात जवान म्हणून कार्यरत आहे. त्याचं लग्न अम्मा गावात राहणाऱ्या सोनल प्रिया यांच्याशी 10 वर्षांपूर्वी झालं होतं. त्यांना 8 वर्षांची एक मुलगी आणि 2 महिन्यांचा एक मुलगा होता; मात्र दहा वर्षांचा सुखाचा संसार झाला असताना त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी वळण आलं. हिमांशू याचे त्याच शहरातल्या शिवानी नावाच्या एका मुलीशी प्रेमसंबंध जुळले. यामुळे दुखावलेली पत्नी नेहमीच त्यांच्या नात्याला विरोध करत राहीली; मात्र हिमांशू याने अखेर विरोध कायमचा संपवला. एके दिवशी सगळे जण घरात झोपलेले असताना हिमांशूने पत्नी व मुलं झोपलेल्या पलंगाला आग लावली. पत्नीच्या ही गोष्ट लक्षात येताच तिनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; मात्र हिमांशूने तिला पुन्हा आगीमध्ये ढकललं. या दुर्दैवी घटनेमधून 8 वर्षांची मुलगी वाचली आहे; मात्र सोनल आणि 2 महिन्यांचं बाळ यांचा मृत्यू झाला. हिमांशू, त्याची प्रेमिका आणि आई-वडील यांनी मिळूनच हे कारस्थान केल्याचं बोललं जातंय. पत्नीचा विरोध संपवण्यासाठी त्यानं हे घाणेरडं कृत्य केलं. पत्नी आणि मुलं झोपलेली असतानाच हिमांशू यानं पलंगाला आग लावली, असं सोनल हिच्या भावानं सांगितलं. स्थानिक व्यक्तींनी दिलेल्या माहितीवरून पोलीस तिथे आले व त्यांनी घटनेची माहिती घेतली. आता पुढील तपास पोलीस करत आहेत. लष्करातल्या जवानाकडून असं कृत्य झाल्यास जनतेनं कोणावर विश्वास ठेवायचा, अशी चर्चा होत आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या अशा घटना सातत्यानं वाढत आहेत. कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.