वॉशिंग्टन 01 डिसेंबर : अमेरिकेतल्या एका व्यक्तीची तीन व्यक्तींच्या हत्येच्या आरोपातून नुकतीच निर्दोष मुक्तता करण्यात आली. एका महिलेने पुढे येऊन साक्ष दिल्यामुळे सुमारे 43 वर्षे जुन्या असलेल्या प्रकरणाचा निकाल पुन्हा जाहीर करण्यात आला. मात्र यादरम्यान, कोणताही गुन्हा केलेला नसूनही, केविन स्ट्रिकलँड (Kevin Strickland) या व्यक्तीला तब्बल 4 दशकांहून अधिक काळ तुरुंगात (America man spent 43 years in prison) राहावं लागलं आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
केविन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1978मध्ये गोळीबाराच्या (1978 shootings) एका घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा आणि केविन यांचा (Accused of 3 murders) खरं तर काहीही संबंध नव्हता. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा ते आपल्या घरी टीव्ही पाहत होते; पण तरीही पोलिसांनी त्यांना पकडून, त्यांच्याविरोधात खटला दाखल केला. त्यावेळी आपण घटनास्थळी नसल्याचे पुरावे दाखवू न शकल्यामुळे केविन यांची रवानगी मिसूरी येथील तुरुंगात (Man arrested in shooting case) करण्यात आली.
घटनेला 43 वर्षं झाल्यानंतर या गोळीबारातून बचावलेली आणि प्रत्यक्षदर्शी असणारी एक महिला पुढे आली. या गोळीबाराच्या घटनेवेळी केविन तिथे उपस्थित (Man set free after 43 years) नव्हते, अशी माहिती तिने न्यायालयात दिली. त्यामुळे केविन यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या महिलेने सांगितले, की इतकी वर्ष पोलिसांच्या दबावामुळे आपण पुढे येऊन याबाबत जबानी देऊ शकलो नव्हतो.
गेल्या आठवड्यातच मिसूरीच्या अपील कोर्टाने केविन यांच्या सुटकेचा आदेश दिला. केविन यांना दोषी सिद्ध करण्यासाठी देण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याचं मत या न्यायालयाने यावेळी व्यक्त केलं. दरम्यान, इतकी वर्षं चुकीच्या आरोपाखाली तुरुंगात राहूनही बाहेर पडल्यानंतर केविन यांना सरकारकडून कोणतीही मदत वा नुकसानभरपाई मिळाली नाही.
केविन यांना सरकारकडून नुकसानभरपाई मिळाली नसली, तरी मिडवेस्ट इनोसन्स प्रोजेक्ट (Midwest innocence project) आणि केविन यांच्या गावातल्या नागरिकांनी मिळून त्यांच्या मदतीसाठी रक्कम उभारली आहे. केविन यांच्याकडे बँक अकाउंट, फोन नंबर किंवा कोणतंही सरकारी ओळखपत्रदेखील नाही. त्यामुळे सध्या ते आपल्या भावाच्या घरी राहत आहेत. केविन यांच्या मदतीसाठी चालवल्या गेलेल्या एका ऑनलाइन अभियानातून 20 हजार जणांनी मिळून तब्बल 11 कोटी रुपये गोळा केले आहेत. लवकरच ही रक्कम केविन यांना देण्यात येणार आहे.
केविन सध्या तुरुंगातून बाहेर आल्यामुळे आनंदी असून, यासाठी त्यांनी देवाचे आभार मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Prisoners, Shocking news