अकोला, 5 जून : पैशासाठी लोकांची येनकेन प्रकारे फसवणूक केल्याचे प्रकार अनेकवेळा पाहायला मिळतात. आता यात सोशल मीडियाही सुटला नाही. सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटवर बनावट अकाऊंट बनवून लोकांची फसवणूक केल्याचेही अनेक प्रकार आता समोर आले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट बनवून नागरिकांना पैशाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अकोला जिल्हाधिकारी यांनी तक्रार केली असून, तपास सुरू करण्यात आला आहे. सोशल मीडियावर फसवणूक केल्याचे अनेक प्रकार अनेकांसोबत घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांचे बनावट फोटो तयार करून बनावट फेसबुक अकाउंट करणे आणि त्यांच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याचा प्रकार सुरू झाला आहे. ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्ती द्वारे पैशाची मागणी केली जाते. अशा बनावट फेसबुक अकाउंट संदर्भात नागरिकांनी सायबर सेलकडे तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत, तेवढे नुकसान सुद्धा आहे. अनेक जणं याचा गैरफायदा घेत बनावट अकाऊंटच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा गोरखधंदा करीत आहेत. यावेळी तर चक्क अकोला जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट अकाऊंट बनवून अकोला शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक यांना पैशाची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर काही जणांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हे ही वाचा- घटस्फोटीत शिक्षिका 11 वीच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांनी केली अटक अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तातडीने अकोल्याचे सायबर सेलचे अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती दिली व यासंदर्भात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या तपासात हे बनवत फेसबुक अकाऊंट राजस्थानमधील बाडनेर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.