पिंपरी, 21 एप्रिल : गुन्हेगारांच्या टोळी युद्धांमुळे पिंपरी-चिंचवड पुन्हा एकदा हादरल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी पिंपरी शहरातील ओटास्कीम भागात गॅंगवारचा भडका उडाला. ज्यामध्ये सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा निर्घृण खून केला. त्या नंतर घटनेचा बदला घेण्यासाठी म्हणून मंगळवारी दुपारी प्रतिस्पर्धी टोळीने आरोपींच्या मित्रांवर खूनी हल्ला केला. या हल्ल्याचे CCTV फुटेजही समोर आले आहेत. घटनेतील आरोपी सोहेल याला मृत आकाशने ‘काय रे कुठे चाललाय’ असे रागात विचारले होते. त्याचा राग मनात धरून तक्रारदार आणि मृत आकाश बोलत थांबलेले असताना सोहेलच्या मित्राने हल्ला चढवत कोयत्याने वार करून आकाशचा खून केला, अशी माहिती मिळते आहे. परिसरात दहशत निर्माण करून आरोपी पळून गेल्याची घटना पिंपरीमध्ये घडली. या घटनेत मृत झालेल्या आकाश उर्फ मोन्या कांबळेच्या खुनाच्या आरोपावरून सोहेल जाधवसह त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, आकाशचा खून झाल्यानंतर त्याचे मित्र बदला घेण्यासाठी तयार असण्याची शक्यता लक्षात घेता त्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवणे आवश्यक होते. मात्र, तशी परिस्थिती न दिसल्याने मृत आकाशच्या चिडलेल्या मित्रांनी मारहाण केलेल्या शक्तीमान आणि प्रकाश कांबळेला गाठून त्यांच्यावर सिमेंटचे गट्टू आणि लाकडी दांडक्याने खुनी हल्ला चढवला. एकामागोमाग घडलेल्या दोन गंभीर स्वरुपाच्या घटनांमुळे निगडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एकीकडे दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या फैलावामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. राज्यात संचारबंदीही लावली आहे. कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यांचे पालन नागरिकांकडून करवून घेण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तरीही टोळीयुद्धासारख्या घटना घडत आहेत. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवाय, कोरोना ड्युटीच्या ताणामुळे पोलीस दलाचे बळ गुन्हेगारी घटना, संभाव्य गुन्हे आणि गुन्हेगारांचे लक्ष देण्यासाठी कमी पडत आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.