नितीन कुमार, प्रतिनिधी
लातूर, 20 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. यातच आता लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाकडे खासगी ट्युशन लावली नाही, म्हणून शिक्षकाने शाळेतील विद्यार्थीनीला मानसिक त्रास दिला. यामुळे तणावात येऊन नववीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या घटनेने लातूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी -
शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या लातूर शहरात शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळं खासगी क्लासेसचं पेव मोठ्या प्रमाणात फुटले आहे. मात्र, आता हे खासगी क्लासेसच विद्यार्थ्यांच्या जिवावर उठले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार लातुरात उघडकीस आला आहे. लातूर शहराजवळ असलेल्या किड्स इन्फो पार्क या ठिकाणी इयत्ता नववीत शिकणाऱ्या श्रावणी नाईकनवरे या विद्यार्थिनीने शाळेतल्या शिक्षकाच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपलं जिवन संपवले .
किड्स इन्फो पार्क या शाळेत शिकवणारे राहुल पवार या शिक्षकाचे गणित विषयाचे खासगी क्लासेस आहेत. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे खासगी ट्युशन लावलीच पाहिजे, असा अलिखित कायदाच या शिक्षकानं केला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव श्रावणीने देखील राहुल पवार याच्याकडे खासगी ट्युशन लावली. मात्र, काही समजत नसल्याने दहा दिवसांनी तिने ट्युशन सोडली.
नेमका हाच राग मनात धरून शाळेत वेळोवेळी श्रावणीच्या अपमान करायचा. तसेच तिला मानसिक त्रास देण्याचे सत्र शिक्षक राहुल पवारने गेल्या वर्षभरापासून सुरु केले होते. अखेर या त्रासाला कंटाळून श्रावणीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिनं सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती. त्यानुसार श्रावणीच्या आईच्या फिर्यादीवरून किड्स इन्फो पार्क येथील शिक्षक राहुल पवार याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती शाह यांनी मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Death, Latur, School children