संकेश्वर, 26 फेब्रुवारी: राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवरून एकाच दुचाकीने प्रवास करणाऱ्या चार मित्रांचा दुर्दैवी शेवट झाला आहे. मध्यरात्री काही कामानिमित्त चारही जण निपाणीला गेले होते. निपाणीहून परत येत असताना चौघांवरही काळानं घाला घातला आहे. वेगात दुचाकीवरून जात असताना, दुचाकी घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये चारही मित्रांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच संबंधितांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या दुर्घटेत तिघांचा जागीच तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बसवराज अर्जुन माळी (26), प्रवीण कल्लापा सनदी (25) आणि मेहबूब सय्यद शेगडी (26) असं जागीच मृत पावलेल्या तिघांची नावं आहेत. संबंधित तिघेही संकेश्वर येथील अनंत विद्यानगर परिसरातील रहिवासी होती. तर मलिकजान जमादार (25) असं उपचारादरम्यान मृत पावलेल्या चौथ्या मित्राचं नाव असून तो बेळगाव शहरातील खंजर गल्ली परिसरातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मेहबूब आणि मलिकजान हे दोघं मामे भाऊ होते. मलिकजान हा काही दिवसांपूर्वी बेळगावहून संकेश्वरला आपल्या नातेवाईकांकडे आला होता. हेही वाचा- दारूची चटक भागवण्यासाठी घेतला सख्ख्या भावाचा घोट, हत्येच्या घटनेनं नांदेड हादरलं गुरुवारी रात्री बसवराज, प्रवीण, मेहबूब आणि मलिकजान चौघेही एकाच दुचाकीने काही कामानिमित्त निपाणीला गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर चौघेही पुन्हा एकाच दुचाकीने संकेश्वरला येत होते. संकेश्वर येथील पर्वतराव यांच्या पेट्रोल पंपाजवळून जात असताना त्यांची दुचाकी अचानक घसरली. दुचाकीचा वेग जास्त असल्याने सर्वजण उडून रस्त्यावर पडले तर काहीजण दुचाकीसह फरफटत गेले. या दुर्घटनेत डोक्याला मार बसून बसवराज, प्रवीण आणि मेहबूब यांचा जागीच मृत्यू झाला. हेही वाचा- जळगावात तमाशा कलावंत तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; भरबाजारात केला हृदयद्रावक शेवट तर मलिकजान हा सर्वात पाठीमागे बसल्याने तो बाजूला उडून पडला होता. त्यालाही गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली. तर मलिकजान याला बेळगावच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी उपाचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मलिकजानचा देखील मृत्यू झाला आहे. एकाच वेळी चार मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.