संतोष कुमार गुप्ता, प्रतिनिधी छपरा, 18 एप्रिल : एका तरुणीच्या प्रेमात वेडे झालेल्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्याची फसवणूक करून तरुणाला आपल्या घरी बोलावून त्याची हत्या केली तसेच ही हत्या नसून अपघात वाटावा, यासाठी त्या युवकाचा मृतदेह रेल्वे रुळावर ठेवण्यात आला होता, अशी चर्चा होत आहे. अनोळखी मृतदेह आढळून आल्यावर लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटवली आणि आणि प्रेमप्रकरणातून हे धक्कादायक कांड घडल्याचे समोर आले. एकमा रेल्वे पोलिसांनी रेल्वे रुळावरून अज्ञात तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह विवेक कुमार या 20 वर्षीय तरुणाचा आहे. तो सिवान जिल्ह्यातील दरोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बौनागंज जलालपूर गावातील रहिवासी असलेले देवनाथ यादव यांचा मुलगा होता. रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने विवेक कुमारचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. पण शासकीय रेल्वे पोलिसांनी शवविच्छेदन करून विवेक कुमारचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. यानंतर आता या मृत्यूमागे वेगळीच कहाणी समोर येत आहे. विवेकचे वडील देवनाथ राय यांनी सांगितले की, ग्यासपुर गावातील एका मुलगी आणि विवेक या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले. दरम्यान, मुलीच्या घरच्यांना दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत कळाले. यापूर्वीही एकदा या मुलीच्या घरच्यांनी फसवणूक करून विवेकला ग्यासपूर गावात बोलावले होते. याठिकाणी त्याला पकडून बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत विवेकच्या नातेवाईकांनाही माहिती मिळाली होती. मात्र, नंतर मुलीच्या कुटुंबीयांनी विवेकला इशारा देऊन सोडून दिले होते. पण यावेळी मुलीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत विवेकचा मोबाइल फोन बंद झाला. काही वेळाने विवेकचा मृतदेह रेल्वे रुळावर पडल्याचे समजले. त्यानंतर नातेवाईकांनी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली आणि शवविच्छेदन केले. दुसरीकडे, एकमाच्या गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांचे सहाय्यक आणि पोलीस निरीक्षक अशोक कुमार यांनी सांगितले की, विवेकचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला होता. मात्र, अद्याप लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर पोलिस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. सध्या विवेकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, प्रेमप्रकरण तरुणाच्या जीवावर बेतले असून, प्रेमाची किंमत तरुणाला मृत्यूने चुकवावी लागली, अशी चर्चा परिसरात आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.