कासिम खान, प्रतिनिधी नूंह, 29 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच आर्थिक फसवणुकीचेही प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली. हरियाणातील नूह जिल्ह्यातील शिक्रावा गावातील 19 वर्षीय कुणालचा मृतदेह झज्जरच्या बदली गावात कालव्यात सापडला. एकत्र शिकणाऱ्या 3 मुलांनी वैमनस्यातून त्यांची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून बदली पोलीस ठाण्यात खुनासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
काय आहे संपूर्ण प्रकरण - कुणालचे वडील श्रीचंद यांनी सांगितले की, माझा 19 वर्षांचा मुलगा प्रभुदयाल उर्फ कुणाल बराच काळ झाहिदपूर जिल्हा झज्जर येथे आपल्या आजोबांच्या घरी शिकत होता. सर्व काही सुरळीत चालले होते, मुलगा मन लावून अभ्यास करत होता, मात्र काही दिवसांपूर्वी एकत्र शिकणाऱ्या मुलांशी त्याचे भांडण झाले, त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. प्रभुदयाल उर्फ कुणालला घराबाहेर काढण्यासाठी तो निमित्त शोधत होता. दरम्यान, माझा मुलगा कुणाल याला त्या तीन मुलांनी आमिष दाखवून बोलावले आणि बदली गावच्या कालव्यात बुडवून ठार मारले. त्यांनी सांगितले की, 21 मे रोजी आम्हाला कुणालच्या आजोबांकडून माहिती मिळाली की, कुणाल सकाळी कोचिंग सेंटरला गेला होता. पण तो ना कोचिंग सेंटरला पोहोचला ना घरी परतला. यानंतर नातेवाईकांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कुणालचा कोणताही सुगावा लागला नाही. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 22 मेला सकाळी आम्हाला माहिती मिळाली की, तुमचा मुलगा मृतावस्थेत कालव्यात मिळाला आहे. यानुंतर तिथे पोहचले असता, तर त्याच्या पोटात पाणी होते तसेच त्याच्या चेहऱ्यावर निशाण होते. यावरुन असे स्पष्ट होते की, आधी त्याला मारहाण करण्यात आली यानंतर पाण्यात बुडवून त्याची हत्या करण्यात आली. कुणालच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाची बॅग, फोन, पर्स, कपडे, कोणतीही वस्तू अद्याप सापडलेली नाही. यामध्ये पोलीस हलगर्जीपणा करत आहेत. आम्हाला न्याय हवा आहे. नराधमांना लवकरात लवकर तुरुंगात पाठवा जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल, अशी मागणी त्यांनी केली आहे. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आणि वृद्ध आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या कुणालच्या निधनामुळे संपूर्ण गावात शोकाचे वातावरण आहे. आई-वडील, बहिणीची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी कुटुंबीयांची एकच मागणी आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.