जिनिव्हा, 02 एप्रिल : गेल्या दोन वर्षांपासून जगभरातल्या अनेक देशांमध्ये कोरोनानं (Corona) कहर केला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सध्या काही देशांमध्ये कोरोना नियंत्रणात आला असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. दुसरीकडे काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. भारतात (India) सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. परंतु, या सर्व पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जगभरातल्या नागरिकांना वेगानं पसरणाऱ्या व्हेरियंटच्या बाबतीत अधिक सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. या वर्षी कोरोनाची साथ कोणत्या तीन संभाव्य मार्गांनी विकसित होऊ शकते, असं अलर्ट केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन (Omicron) आणि डेल्टा (Delta) या व्हेरिएंट्सच्या (Variant) संयोगातून तयार झालेला डेल्टाक्रॉन (Deltacron) हा विषाणू (Virus) वेगानं फैलावतो. याशिवाय ओमिक्रॉनचा सबव्हॅरिएंट BA.2ची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. कोविड-19 च्या नव्या व्हॅरिएंटमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे वाचा - आता नाकावाटे मिळणार कोरोना लस; भारतात दिल्या जाणाऱ्या Sputnik V ची Nasal Vaccine तयार रिपोर्ट नुसार ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रोस अडनॉम गेब्रियेसस यांनी माहिती देताना सांगितलं, ‘कोविड -19 हा विषाणू सतत विकसित होत आहे, हे आम्हाला माहीत आहे. परंतु, लस (Vaccine) आणि संसर्गामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता कालांतराने कमी होत जाते. प्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत झाल्यास कोविड-19 च्या केसेसमध्ये आणि मृत्यूच्या संख्येत वेळोवेळी वाढ होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत असुरक्षित व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज भासू शकते,’ ‘कमी गंभीर स्वरूपाचा व्हॅरिएंट उदयास आला, तर लशीचा बूस्टर डोस किंवा नव्या फॉर्म्युलेशनची गरजही भासणार नाही. दुसरीकडे अत्यंत वाईट परिस्थितीत, कोविड-19 चा अधिक प्राणघातक आणि वेगानं फैलावणारा व्हेरिएंट समोर येऊ शकतो. अशा नव्या धोक्याविरुद्ध लसीकरण किंवा संसर्गामुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती कमी होईल किंवा वेगानं नाहीशीदेखील होईल,’ असं गेब्रियेसस यांनी सांगितलं. हे वाचा - बोलायचं असतं एक मात्र बोलतो भलतंच; असं होत असेल तर हे गंभीर आजाराचं लक्षण कोविड-19 चा तीव्र टप्पा संपवण्यासाठी पुढं कसं जायचं, या प्रश्नावर उत्तर देताना गेब्रियेसस म्हणाले, की ‘यासाठी जगभरातल्या सर्व देशांनी 5 मुख्य घटकांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. यात पहिले घटक म्हणजे सर्व्हेलन्स, लॅबोरेटरीज आणि सार्वजनिक आरोग्यविषयक माहिती. दुसरे घटक म्हणजे लसीकरण, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय. कोविड-19 साठी क्लिनिकल केअर आणि लवचिक आरोग्य प्रणाली हे यातले तिसरे घटक होय. चौथ्या घटकांमध्ये संशोधन आणि विकास, डिव्हाइस पुरवठ्यासाठी एकसमान मार्ग यांचा समावेश होतो. यातला पाचवा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे आपत्कालीन स्थितीपासून दीर्घकालीन श्वसन रोग व्यवस्थापनापर्यंत रिस्पॉन्स ट्रान्झिशन स्वरूपात समन्वय हा होय.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.