Corona चे स्रोत मानली जाणारी वटवाघळंच आता व्हायरसपासून वाचवणार?

Corona चे स्रोत मानली जाणारी वटवाघळंच आता व्हायरसपासून वाचवणार?

Coronavirus शी लढण्यासाठी वटवाघळांमध्ये (bats) असलेल्या अँटिबॉडीजने (antibodies) उपचार होतील, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

  • Share this:

वॉशिंग्टन, 30 एप्रिल : कोरोनाव्हायरस (Coronavirus) जगभर थैमान घालतोय, या जवळपास 5 महिने झालेत. हा व्हायरस नेमका आहे कसा हे समजून घेण्यात आणि त्याच्याविरोधात उपचार शोधण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. व्हायरस नेमका आला कुठून हेदेखील अद्याप माहिती नाही. मात्र वटवाघूळ (bats) या व्हायरसचा स्रोत असावा असं मानलं जातं आहे. मात्र ज्या वटवाघळांना कोरोनाव्हायरसचा स्रोत मानलं जातं आहे त्याच वटवाघळांमुळे या व्हायरसवरील उपचार शक्य आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

वटवाघळांवर रिसर्च करणारे अमेरिकेतील शास्त्रज्ञ पीटर डेसजॅक (Peter Daszak) यांच्या मते, ज्याच्याकडून हा व्हायरस आला आहे, त्याच्यामार्फतच उपचारही होऊ शकतो.

पीटर डेसजॅक हे व्हायरस हंटर आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वटवाघळांमधील व्हायरससंबंधीत रिसर्च करतात. इको हेल्थ अलायन्स या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून ते काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 20 देशांमधील वटवाघळांचे नमुने जमा केलेत.

हे वाचा - भविष्यातील महासाथीपासून जगाला वाचवणारे 'व्हायरस हंटर्स'

वटवाघळांमध्ये मानवासाठी घातक ठरणाऱ्या कोरोनाव्हायरसचा शोध घेण्यासाठी पीटर यांनी चीनच्या युन्नान प्रांतावर लक्ष केंद्रीत केलं. जिथं भरपूर वटवाघळं आहेत. पीटर सांगतात, "चीनमध्ये सार्स आजार पसरल्यानंतर शास्त्रज्ञांनचं या ठिकाणी लक्ष गेलं. मात्र आता वटवाघळांमध्ये शेकडो व्हायरस असतात जे धोकादायक असू शकतात असं दिसून आलं आहे" त्यांनी तिथल्या वटवाघळांचे जाळे, थुंकी, रक्त, मलमूत्र, पंख असे विविध नमुने जमा केले.

"आपल्या टीमसह आपण कोरोनाव्हायरस फॅमिलीतील 15 हजारपेक्षा जास्त नमुने जमा केलेत. त्यापैकी 500 नमुने नव्या कोरोनाव्हायरसशी मिळतेजुळते दिसलेत", असं पीटर यांनी सांगितलं. 2013 साली वुहानच्या एका गुफेतून मिळालेला नमुना कोविड-19 च्या आधीच्या व्हायरसचा नमुना असावा, असं मानलं जातं आहे.

हे वाचा - Coronavirus चा स्रोत समजल्या जाणाऱ्या वटवाघळाची या गावात केली जाते पूजा

शास्त्रज्ञांनी युन्नानमधील जिन्निंग शहरात काम करताना तिथल्या लोकांचे रक्ताचेही नमुने घेतले. पीटर यांच्या टीमला त्या नमुन्यांचा अहवाल पाहून आश्चर्य वाटलं, कारण तिथं राहणाऱ्या 3 टक्के लोकांच्या शरीरात अशा सर्व अँटिबॉडीज होत्या ज्या फक्त वटवाघळांमध्ये असतात. याचा अर्थ त्यांना आधीच व्हायरसची लागण झाली आहे आणि त्याचं शरीर या आजारांशी लढण्यासाठी सक्षम झालेलं आहे.

चीनमध्ये कोरोनाचं पहिलं प्रकरण समोर आल्यानंतर वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीने कोरोनाव्हायरसच्या लायब्रेरीचा डेटाबेस तपासला. त्यात युन्नानमध्ये 2013 साली हा व्हायरस दिसून आल्याचं समजलं. दोन्ही व्हायरसमध्ये 96.2% समानता दिसून आली. व्हायरसचा स्रोत समजल्यानंतर लसीचा शोध लावणं सोपं होतं.

हे वाचा - 'Make or Break', कोरोना लढ्यात भारतासाठी मे महिना महत्त्वाचा; तज्ज्ञांनी दिला सल्ला

आता पीटर यांनी दावा केली आहे की, वटवाघळांच्या शरीरात असणाऱ्या अँटिबॉडीजनी कोरोनाव्हायरसवर उपचार होऊ शकतो. Duke-NUS मधील व्हायरोलॉजिस्ट वँग लिम्फादेखील याच्याशी सहमत आहेत. त्यांच्या मते, वटवाघळांच्या रक्ताचे जे नमुने घेण्यात आलेत, त्यात भरपूर प्रमाणात अँटीबॉडीज आहेत. त्या कोरोनाव्हायरमुळेच बनल्या असाव्यात आणि याच आधारावर कोविड-19 विरोधात लस तयार होऊ शकते.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 30, 2020, 7:40 PM IST

ताज्या बातम्या