मुंबई, 7 जून : आज पंतप्रधान मोदी यांनी लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मोदींनी यावेळी केली. लशीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकार व केंद्रामध्ये वाद सुरू होता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा केंद्राकडून लस उपलब्ध होत नसल्याचं सांगितलं आहे. राज्यात लशीच्या तुटवड्यामागे राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आला आहे. याबाबत अनेकदा लशींची खरेदी करण्यासाठी एकरकमी चेक तयार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देणार असल्याची घोषणा केल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा चेक मात्र तसाच राहिला आहे.
कोरोनाशी (Corona) लढा देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Naredra Modi) यांनी जनतेशी संवाद साधत असताना आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली. 'देशात यापुढे सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे, राज्यांवरील जबाबदारी ही आता केंद्राकडेच असणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे.
हे ही वाचा-'सर्व नागरिकांना मोफत लस मिळणार', PM मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, त्या निमित्ताने 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत लस देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पुढील कार्य पूर्ण करायचे आहे, असंही मोदींना स्पष्ट केलं. तसंच, ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नसेल, त्यांना खासगी रुग्णालयामध्ये लस घ्यायची असेल तर ते पैसे देऊन लस विकत घेऊ शकतात. लसीची जी किंमत आहे, त्यावर 150 सर्व्हिस चार्जच खासगी हॉस्पिटल घेऊ शकतात, असंही मोदींनी स्पष्ट केलं.
'देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. कोरोनाविरोधातल्या लढाईत आपण अनेकानां गमावलं. कोरोनामुळे ज्या लोकांचा मृ्त्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबांसोबत माझ्या सहवेदना कायम आहे. गेल्या १०० वर्षातली ही मोठी महामारी आहे. कोविड हॉस्पिटल, औषध सेवा पुरवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. नौदल, वायू सेना सर्वांनी जीवाची बाजी लावून काम केले.' असं सांगत कोरोना योद्ध्यांचं मोदींनी कौतुक केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.