नवी दिल्ली 05 जानेवारी : जगावर असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pandemic) संकट पुन्हा गडद होत आहे. कोरोना व्हायरसच्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत सर्वत्र पसरत आहे. ओमायक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. युरोपमध्ये तर ओमायक्रॉननं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भारतातदेखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून तो वेगाने पसरत आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त झाली आहे. यापैकी दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा (Delta variant) जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो आहे, त्यामुळं केंद्र सरकारनं (Central Government) सर्व राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये निर्बंध (Covid restriction) लावण्यास सुरुवात झाली आहे. सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ज्या पद्धतीनं ऑक्सिजनसाठी रुग्णांचे हाल झाले होते, तशी स्थिती तिसऱ्या लाटेमध्ये निर्माण होण्याची शक्यता नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. शिवाय डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणं (Omicron symptoms) लवकर दिसून येतात, असं निदर्शनास येत आहे. ओमायक्रॉनची लागण होत असताना आणि लागण झाल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीमध्ये काही बदल झालेले दिसून येतात. नवभारत टाईम्सनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ओमायक्रॉन संसर्गामध्ये, रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन लेवल (Oxygen Level) कमी होत नाही आणि चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होत नाही. ही स्थिती डेल्टाची लागण झाल्यानंतर निर्माण होत असे. मात्र, ओमायक्रॉनमध्ये अद्याप ही लक्षणं कुणाला जाणवलेली नाहीत. ओमायक्रॉनची लक्षणं ही काहीशी व्हायरल इन्फेक्शनसारखी (Viral infection) आहेत. त्याची लागण झालेल्या व्यक्तीला थकवा जाणवू शकतो तसेच हार्ट रेटमध्ये (Heart Rate) वाढ होऊ शकते. अनेक रुग्णांना तर घसादुखीचाही त्रास जाणवू लागला आहे. ओमायक्रॉन संसर्ग थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे सध्या तो डेल्टा व्हेरिएंटइतका तीव्र दिसत नाही. मात्र, तो डेल्टापेक्षा कितीतरी अधिक पटीने संसर्गजन्य आहे. यामुळं नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. ओमायक्रॉनची लक्षणं ही काहीशी व्हायरल इन्फेक्शनसारखी असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलेलं आहे. ओमायक्रॉन संसर्ग घशापासून सुरू होतो आणि त्याच ठिकाणी वाढतो, असं ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रूग्णांवरील उपचार आणि संशोधनातून निदर्शनास आलं आहे. ओमायक्रॉन संसर्ग घशापर्यंतच जास्त राहत असल्यामुळं फुफ्फुसं (Lungs) बाधित होण्यापासून वाचतात. डेल्टा व्हेरिएंटमध्ये थेट रुग्णाच्या फुफ्फुसावर परिणाम होत असे त्यामुळं श्वास घेण्यास त्रास होत होता. ओमायक्रॉन रुग्णांना हा त्रास जाणवत नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. घसादुखीशिवाय (Sore throat) ओमायक्रॉनमध्ये थकवा येणं, सांधेदुखी, सर्दी आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणं दिसत आहेत. ब्लॅक फंगसचा धोका नाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता. त्यासोबत अनेक रुग्णांना म्युकरमोयकोसिस (Mucormycosis) नावाच्या ब्लॅक फंगसचही इन्फेक्शन झालं होतं. हे इन्फेक्शन जास्त जीवघेणं ठरलं होतं. ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये अद्याप असं काही घडलेलं नाही. मास्क वापरणे आणि लस घेणं या पर्यायांचा वापर करून ओमायक्रॉनपासून संरक्षण करता येईल, असं डब्ल्यूएचओनं (WHO) म्हटलं आहे. जरी लसीकरण झालेल्या लोकांनासुद्धा ओमायक्रॉनची लागण होत असली तरी शरीरातील इन्फेक्शनचं प्रमाण कमी आहे, असंही डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलं आहे. ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. त्यानंतर तो जगभरात पसरला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि डेथ रेट कमी आहे. मात्र, जगभरात हीच स्थिती कायम असेल याबाबत शंका असल्याचं डब्ल्यूएचओमधील कोविड-19 व्यवस्थापक डॉ. अब्दी महमूद (Dr. Abdi Mahmoud) यांनी म्हटलं आहे. महमूद यांच्या मते, दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती इतर देशांसाठी आदर्श मानली जाऊ शकत नाही कारण प्रत्येक देश विविध बाबींमध्ये वेगळा आहे. म्हणजेच प्रत्येक देशावर ओमायक्रॉनचा वेगळा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे प्रत्येक देशानं आणि नागरिकानं आपापल्या परीनं उपाययोजना करण्याची गरज आहे, असं डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलं आहे. एकूणच ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा इतका घातक नसला तरी परिस्थितीनुसार तो घातक ठरू शकतो. म्हणून ओमाक्रॉनची लक्षण जाणवल्यास लगेच डॉक्टरांची भेट घ्यावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.