वॉशिंग्टन, 31 डिसेंबर : गेल्या दोन वर्षांपासून जगभरातल्या विविध देशांमध्ये कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. या कालावधीत कोरोनाचे अनेक नवे व्हेरिएंट्स (Corona Variant) आढळून आले आहेत. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा या कोरोनाच्या व्हेरिएंट्समध्ये नुकतीच ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएंटची भर पडली आहे. ओमिक्रॉनने जगभरातल्या देशांना चिंतेत टाकलेलं असताना एक दिलासादायक बाब समोर येत आहे. ओमिक्रॉनसह कोरोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटमधल्या विशिष्ट घटकांना लक्ष्य करून त्यांना निष्क्रिय करणाऱ्या अँटीबॉडीज (Antibodies) सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
ओमिक्रॉन हा नोव्हेंबर महिन्यात सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आला. हा व्हेरिएंट कोरोनाच्या अन्य व्हेरिएंट्सच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गक्षम आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमिक्रॉनला व्हेरिएंट ऑफ कर्न्सन असं म्हटलं आहे. हा व्हेरिएंट अल्पावधीतच अनेक राष्ट्रांमध्ये पोहोचला असून, काही देशांमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. भारतातदेखील गेल्या काही दिवसांत ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
मात्र आता ओमिक्रॉनसह अन्य व्हेरिएंट्सना पायबंद करू शकेल असा उपाय सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. याबाबतचं संशोधन नेचरमध्ये (Nature) प्रसिद्ध झालं आहे, असं वृत्त झी न्यूज हिंदीने दिलं आहे.
हे वाचा - डॉक्टर Omicron कोरोना प्रकारावर कसे उपचार करतात? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमधल्या स्पाइक प्रोटीनमध्ये (Spike Protein) 35 म्युटेशन्स (Mutation) आहेत. याचा वापर विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करून त्यांना संसर्ग करण्यासाठी करतात. नवीन व्हेरिएंट एवढ्या वेगाने का पसरतो, ज्यांनी लस घेतली आहे तेदेखील यामुळे कसे संसर्गग्रस्त होतात, तसंच ज्यांना पूर्वी संसर्ग झाला आहे, त्यांना पुन्हा संसर्ग का होतो, हे या बदलातून अंशतः स्पष्ट होतं.
याबाबत अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनचे सहाय्यक प्राध्यापक डेव्हिड वेसलर यांनी सांगितलं की, "रोगप्रतिकारक शक्ती आणि अँटीबॉडीजच्या क्रियांपासून ही नवी म्युटेशन्स कसा बचाव करतात यासंबंधीची उत्तरं शोधत असताना, या नव्या म्युटेशन्सच्या परिणामांचं मूल्यांकन करण्यासाठी संशोधकांनी एक अकार्यक्षम आणि प्रतिकृती बनवू न शकणारा सुडो व्हायरस तयार केला आणि त्याच्या मदतीनं संशोधन केलं. त्यावरून असं दिसून आलं, की स्पाइक प्रोटीनमधल्या सर्वाधिक संरक्षित साइट्सना म्हणजेच विशिष्ट घटकांना लक्ष्य करणाऱ्या अँटीबॉडीजवर लक्ष केंद्रीत केल्यास, विषाणूच्या सातत्याने होणाऱ्या उत्क्रांतीपासून मुक्त होण्याचा मार्ग शोधणं शक्य आहे"
हे वाचा - डॉक्टर Omicron कोरोना प्रकारावर कसे उपचार करतात? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
या संशोधनामुळे लसनिर्मिती करणं आणि अँटीबॉडीजच्या मदतीनं उपचार करणं शक्य होणार आहे. केवळ ओमिक्रॉनच नाही तर भविष्यातल्या कोणत्याही व्हेरिएंटवर हे उपचार प्रभावी ठरू शकणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus