मॉस्को, 17 ऑक्टोबर : भारतामध्ये कोरोना विषाणूची (India Corona) दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाला अजूनही हलक्यात घेणं धोकादायक ठरू शकतं. रशियामध्ये कोरोनाबाधित (Russia corona update) रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक 34,303 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एक महिन्यापूर्वीच्या रुग्णसंख्येत आता 70 टक्क्यांनी वाढ झाल्यानं चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण सातत्यानं वाढत आहे. रशियाच्या कोरोना विषाणू प्रतिबंध कृती दलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात कोविड -19 चे नवीन 34,303 रुग्ण सापडले आहेत. त्या तुलनेत एक महिन्यापूर्वी 19 सप्टेंबर रोजी 20,174 कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. रविवारी रशियामध्ये 999 कोविड -19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जो शनिवारी झालेल्या 1002 मृत्यूंपेक्षा किंचित कमी आहे. हे वाचा - ‘…तर दिवाळीनंतर 2 डोसची अट शिथिल करणार’, आरोग्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक माहिती रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकांना लॉटरी, बोनस आणि इतर प्रोत्साहन सवलती देऊन लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, या प्रयत्नांना लसींबद्दल लोकांना असलेल्या व्यापक शंका आणि अधिकाऱ्यांकडून परस्परविरोधी माहिती दिल्यानं खीळ बसत आहे. रशियात लसीकरण फार कमी वेगाने होत आहे, लोक लस घेण्याविषयी उत्साही नाहीत. रशियन सरकारने या आठवड्यात सांगितले की, देशाच्या सुमारे 14.6 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 4.3 कोटी किंवा 29 टक्के लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. हे वाचा - मुंबईकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी; कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एकही मृत्यू नाही एवढ्या मोठ्या संख्येने कोविड -19 रुग्णांच्या मृत्यूनंतरही क्रेमलिनकडून नवीन राष्ट्रीय लॉकडाऊन लागू करण्यास नकार दिला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तो लावण्यात आला होता. मात्र, आता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रादेशिक प्रशासनाला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.