नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी: गेल्या 2 वर्षांपासून सगळ्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने (Coronavirus Pandemic) लाखो जणांचा बळी घेतला आहे, तर कोट्यवधी जणांना त्याची लागण झाली आहे. या आजारातून अनेक जण बरे झाले आहेत. या रोगाबाबत विविध संशोधनं सुरू आहेत. त्यापैकी एका संशोधनानुसार, ज्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग दीर्घ काळ झाला होता, त्यांच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम झाले (Prolonged Covid Infection Side Effects) असून, त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. स्पेन युनिव्हर्सिटीमधल्या (Spain University) जर्मन ट्रायस आय पुंजोल हॉस्पिटलच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाचं वृत्त hindustannewshub ने दिलं आहे. ज्यांचा कोरोना संसर्ग खूप काळ टिकला होता, त्यांच्या व्हेगस नर्व्हच्या (Vagus Nerve) कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि काम करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांवरही (Heart Beat) त्याचा परिणाम होऊ शकतो. व्हेगस नर्व्ह आपल्या हृदयाचे ठोके आणि बोलण्याची क्षमता निर्धारित करते. मेंदूपासून संपूर्ण शरीरापर्यंत जाणारी व्हेगस नर्व्ह हृदय, फुफ्फुसं आणि आतड्यांपर्यंत जाते. अन्न गिळताना घशाच्या स्नायूंवरही व्हेगस नर्व्हचं नियंत्रण असतं. यासोबतच हृदयाचे ठोके, बोलण्याची क्षमता, घाम येणं आणि शरीराच्या इतर हालचालींवर या नर्व्हचं नियंत्रण असतं. हे वाचा- Good News..!12 ते 18 वयोगटातील मुलांना लवकरच मिळणार आणखी एक Corona लस दीर्घ काळापासून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या संशोधनात 348 रुग्णांचा समावेश होता. या दरम्यान, सुमारे 66 टक्के रुग्णांनी मज्जातंतूच्या कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे किमान एक लक्षण 14 महिने कायम राहिल्याची तक्रार केली. संशोधक डॉ. जेम्मा लाडोस (Dr. Gemma Lados) यांच्या म्हणण्यानुसार, ज्या रुग्णांना दीर्घ काळ कोरोनाची लागण झालेली असेल, अशा रुग्णांना बोलण्यास त्रास होणं, अन्न गिळण्यास त्रास होणं, चक्कर येणं, हृदयाचे ठोके असामान्य होणं अशी लक्षणं दिसू शकतात. या संशोधनात समोर आलेल्या परिणामांमुळे दीर्घ काळापासून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना भेडसावणाऱ्या इतर समस्या समजून घेण्यास मदत होऊ शकते. दीर्घकालीन कोरोना संसर्ग शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करू शकतो. 10 ते 15 टक्के व्यक्तींना याचा त्रास होऊ शकतो. ही लक्षणं काही आठवडे ते वर्षभर टिकू शकतात.’ हे वाचा- कोरोनापेक्षाही घातक विषाणू; वर्षानुवर्षे राहातो मेंदूत दडून, मृत्यूदरही 50 टक्के एप्रिल 2022 मध्ये लिस्बन इथं होणाऱ्या युरोपियन काँग्रेस ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजेस (ECCMID 2022) या परिषदेमध्ये हे संशोधन सादर करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.