तिरुवनंतपुरम, 23 ऑगस्ट : भारतात कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) सर्वात पहिलं प्रकरण आढळून आलं होतं ते केरळमध्ये (Kerala). लॉकडाऊनदरम्यान इथल्या कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाला होता मात्र जूनमध्ये अचानक प्रकरणं झपाट्याने वाढू लागली आहेत. ही परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा (Health Minister K K Shailaja) आपल्या जीवाचं रान करत आहेत. सकाळी सहा ते अकरा त्या इतक्या व्यस्त असता की आपलं कुटुंबं आणि स्वत:साठीही त्यांना वेळ देता येत नाही. कोरोनाच्या या परिस्थितीत त्यांचा दिनक्रम कसा असतो, त्यांचा एक दिवस आपण पाहुयात.
डॉ. शैलजा यांचा दिवस सुरू होतो तो सकाळी सहा वाजता. तिथूनच त्यांच्या कामाची सुरुवात होती. आरोग्य सचिव, आरोग्य संचालक यांच्यासह दररोज त्या राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा करतात. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसह संध्याकाळी सात वाजल्यानंतर त्यांची ऑनलाइन बैठक होते. ही मीटिंग रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असते. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं.
अशा व्यस्त वेळापत्रकात सॅनिटायझर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. त्या ग्लोव्ह्ज घालत नाही मात्र हँड सॅनिटायझरचा नियमित वापर करतात. बैठकीत आणि घरीदेखील त्या तीन लेयरचा कापडी मास्क वापरतात. मात्र रुग्णालयांना भेट देताना त्या N-95 मास्क आपल्या चेहऱ्यावर लावतात. सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं आणि सॅनिटायझरचा वापर या नियमांचं त्या स्वत: पालन करत आहेत आणि इतरांनाही करायला लावत आहेत. जेव्हा गरज वाटते तेव्हा त्या स्वत:ला आयसोलेट करून घेतात.
हे वाचा - कोरोना लशीत तुम्हीही देऊ शकता योगदान; ट्रायलमध्ये सहभागासाठी काय आहेत अटी वाचा
शैलजा यांनी सांगितलं, "मी ट्रेन आणि विमानाने प्रवास करणं टाळते, त्याऐवजी कारने प्रवास करते. मी आजारी पडणं परडवणारं नाही. कारमध्येच मला सुरक्षित असल्यासारखं वाटतं. या काळात स्क्रिन एक्स्पोझर माझ्यासाठी मोठी समस्या झाल्याचंही त्यांनी सांगितलं. दररोज दिवसभर सरासरी पाच तास तरी स्क्रिनसमोर जातात. काही दिवस माझ्या डोळ्यांमध्ये वेदना होत्या. मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी मला आयड्रॉप दिले आहेत. त्याचा वापर मी करते"
कोरोना महासाथीबाबत मनातील विचार दूर करण्यासाठी काय करतात याबाबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, "कोरोना महासाथीचा विचार मनात कायम असतो, जेव्हा मी झोपते तेव्हादेखील मृत्यूच्या आकड्यांबाबत भीती वाटते. देश या परिस्थितीतून बाहेर कसा पडेल याचीच चिंता वाटते"
हे वाचा - 'या' वयोगटातील मुलांसाठीही मास्क बंधनकारक! WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स
कोरोना महासाथीशी लढताना शैलजा गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या कुटुंबाला भेटल्या नाहीत. व्यस्त वेळापत्रकांमुळे दिवसभर त्यांचं कुटुंबाशी फोनवरही बोलणं होत नाही. त्यांना कुटुंबासाठी आणि स्वत:साठी वेळ मिळतो तो रात्री अकरानंतर.
शैलजा यांनी सांगितलं, "सुरुवातीला मी दर शुक्रवारी कन्नुरला माझ्या घरी जायचे आणि रविवारी संध्याकाळी तिरुवनंतपुरमला परत यायचे. मात्र आता दोन महिने झाले मी माझ्या कुटुंबाला पाहिलं नाही. रात्री अकराच्या सुमारास मी कुटुंबातील सदस्यांशी व्हिडीओ कॉलमार्फत संवाद साधते"
"माझे पती, मुलगा, सून आणि माझी दोन वर्षांची नात माझ्या फोनची वाट पाहत असतात. माझी नात मला व्हिडीओ कॉलवर तिनं काढलेली चित्रं दाखवते. ते चित्र पाहून तिच्याशी बोलून मला कोरोनाच्या या परिस्थिती आलेल्या ताणावर मात करायला खूप मदत होते. कुटुंबाच्या सदस्यांना केलेल्या एका व्हिडीओ कॉलमधून त्यांना खूप बरं वाटतं. त्यानंतर मी वृत्तपत्रातील लेख, संपादकीय वाचते, युट्युब पाहते", असं शैलजा यांनी सांगितलं.
हे वाचा - कोरोना व्हायरस संपला तरी जगावरचं दुसरं संकट कायम आहे, शास्त्रज्ञांनी दिला इशारा
रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास शैलजा यांचा दिवस संपतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी शैलजा यांचा हाच दिनक्रम पुन्हा सुरू होतो.
"महासाथ संपल्यानंतर केरळच्या 14 जिल्ह्यांतील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना मला भेटायचं आहे. त्यांना काय समस्या आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत. तसंच जे काही आरोग्य प्रकल्प रखडले आहेत त्यावरही लक्ष केंद्रीत करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मला माझे पती आणि माझ्या कुटुंबाला भेटायचं आहे. माझ्यासाठी ही सर्वोत्कृष्ट विश्रांती असेल", असं शैलजा म्हणाल्या.