जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Omicron च्या संकटात शास्त्रज्ञांकडून मोठा दिलासा; हाच व्हेरिएंट करणार कोरोना महासाथीचा खात्मा

Omicron च्या संकटात शास्त्रज्ञांकडून मोठा दिलासा; हाच व्हेरिएंट करणार कोरोना महासाथीचा खात्मा

ओमिक्रॉन हा नैसर्गिक लस (Omicron Natural Vaccine) म्हणून काम करणारा विषाणू असून या वर्षाखेरीस कोरोनाची साथ संपवू शकतो असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    वॉशिंग्टन, 05 जानेवारी : सध्या जगभरात ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या रूपामुळे रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून, आपल्या देशातही ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पुन्हा कठोर निर्बंध लागू केले जात आहेत; मात्र ओमिक्रॉन हा शत्रू नसून मित्र असल्याचा दावा अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी (USA Scientist) केला आहे. नैसर्गिक लस (Omicron Natural Vaccine) म्हणून काम करणारा हा विषाणू या वर्षाखेरीस कोरोनाची साथ (Coronavirus Pandemic) संपवू शकतो असा निष्कर्ष त्यांनी नोंदवला आहे. 1918 मध्ये आलेला स्पॅनिश फ्लू 1922 मध्ये त्याचा विषाणू कमकुवत झाल्यानंतर जवळजवळ संपला. त्यामुळे 100 वर्षांनंतर आलेल्या कोरोनाची स्थिती 2022 मध्ये स्पॅनिश फ्लूसारखी होऊन तो संपेल, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. ओमिक्रॉन नैसर्गिक लस अमेरिकेत येल युनिव्हर्सिटीमध्ये (Yale University) करण्यात आलेल्या संशोधनानुसार, ओमिक्रॉन हा विषाणू नैसर्गिक लस म्हणूनही काम करत असल्याचं आढळलं असून, त्याच्या प्रसारामुळे कोरोनाची साथ संपण्यास मदत होईल, असा निष्कर्ष समोर आला आहे. विषाणूमध्ये होत असणाऱ्या उत्परिवर्तनांमुळे म्हणजेच म्युटेशनमुळे एक तर तो कमकुवत होतो किंवा पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक बनतो. त्यानुसार कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) अधिक घातक होता; मात्र डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरणारा ओमिक्रॉन हा कमकुवत व्हेरिएंट आहे. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असली, तरी त्याची लक्षणं अगदी सौम्य असून, रुग्णाची स्थिती गंभीर होण्याचं प्रमाणही अत्यंत कमी आहे. हे वाचा -  मानवी हाडांमधील `हा` घटक रोखू शकतो ओमिक्रॉनला! संशोधनातून नवीन माहिती समोर ब्रिटनमध्ये (Britain)ओमिक्रॉनच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या व्यक्तींमध्ये उच्च क्षमतेच्या अँटीबॉडीज (Antibodies) तयार झाल्याचं आढळलं आहे. लसही हेच काम करते; मात्र ओमिक्रॉनपासून शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज अत्यंत शक्तिशाली असून कोणतीही लस अशा अँटीबॉडीज विकसित करू शकत नाही, असं या संशोधनात स्पष्ट झालं आहे. कदाचित याच कारणामुळे अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही ते गंभीर मानलं जात नसल्याचं दिसतं. सध्या अमेरिकेत कोरोनाचे अडीच लाख आणि ब्रिटनमध्ये सुमारे दीड लाख कोरोना रुग्ण आढळून येत आहेत; मात्र तिथं मृतांचा आकडा तीन ते चार पट कमी आहे. यावरून ओमिक्रॉनचा संसर्ग धोकादायक नसल्याचं स्पष्ट होत असल्याचं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आणि उपचार करण्याची आवश्यकता नसते. उलट ज्याप्रमाणे सामान्य सर्दी चार-पाच दिवसांत निघून जाते. त्याचप्रमाणे त्याची लक्षणंही चार-पाच दिवसांत निघून जातात, असं आढळलं आहे. त्यामुळे अमेरिकेत ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशन पाच दिवसांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. पाच दिवसांनी लक्षणं न दिसल्यास ते घराबाहेर जाऊ शकतात; मात्र या काळात त्यांना मास्क लावावा लागणार आहे. डेल्टा व्हेरिएंटमध्ये प्रति 100पैकी 30 रुग्णांना संसर्ग झाल्यानंतर तीन ते चार दिवसांत रुग्णालयात दाखल करावं लागत होतं. परंतु ओमिक्रॉनमध्ये हा आकडा प्रत्येक 100 पैकी फक्त 10 ते 13 इतका आहे आणि या 13 रुग्णांमध्येही 50 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत नाही. ही अतिशय दिलासादायक स्थिती आहे. भारतातील ओमिक्रॉनची परिस्थिती झी न्यूज हिंदी च्या रिपोर्टनुसार आपल्या देशातली (India) स्थिती बघितल्यास, 27 डिसेंबर रोजी सुमारे 6 हजार जणांना कोरोनाची लागण झाली होती; पण 2 जानेवारीला दिवसाला 33 हजार केसेस वाढल्या. म्हणजेच संसर्ग चौपट वेगाने पसरत आहे; पण मृतांचा आकडा बघितला तर इतर देशांप्रमाणे त्यात घट झाली असल्याचं आढळत आहे. 27 डिसेंबर रोजी 6 हजार रुग्ण आढळले होते. त्यात 293 मृत्यू झाले होते. आता जेव्हा एका दिवसात 33 हजार जणांना संसर्ग झाला आहे, तेव्हा मृत्यू दर दररोज 123 म्हणजे निम्म्याहून कमी आहेत. हे वाचा -  चीनमध्ये कोरोनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना केलं जातंय लक्ष्य! दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असली, तरी गंभीर प्रकरणं आणि मृत्यूची संख्या खूपच कमी आहे. यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे अधिकृत 1700 रुग्ण असून, त्यापैकी 639 बरे झाले आहेत. आतापर्यंत फक्त एका मृत्यूची पुष्टी झाली आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखीच दिसून आली आहेत. नाक वाहणं आणि घसा खवखवणं हे यातलं पहिलं आणि प्रमुख लक्षण आहे. याशिवाय अन्न खाण्याची इच्छा न होणं, थोड्याच वेळात ताप येणं, स्नायू दुखणं, थकवा जाणवणं ही अन्य लक्षणं आहेत. त्यामुळे वेळीच विलगीकरण केलं जात नसल्यानं संसर्ग वाढत आहे. वेळीच लक्ष दिल्यास हा संसर्ग कमी करणंही शक्य आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात