जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / इथं पोहोचला नाही कोरोना लशीचा एकही डोस; कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान

इथं पोहोचला नाही कोरोना लशीचा एकही डोस; कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान

इथं पोहोचला नाही कोरोना लशीचा एकही डोस; कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान

भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लशीची निर्मिती केली जात आहे. मात्र लशीचं वितरण समान प्रमाणात होत नसल्याचं दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 24 मे : जगभरात गेल्या वर्षांपासून हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गानं लाखो लोकांचे बळी घेतले असून कोट्यवधी लोकांना याची लागण झाली आहे. हा संसर्ग थांबवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) आता उपलब्ध झाली असून हाच संसर्ग कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लसीकरण वेगात सुरू करण्यात आलं आहे. ब्रिटन, इस्रायल,अमेरिका आदी देशांमध्ये तर मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यानं तिथल्या सार्वजनिक जीवनावर असलेले निर्बंध दूर झाले आहेत. लोक मुक्तपणे फिरू शकत आहेत. यामुळे हळूहळू जगभरात सकारात्मक वातावरण निर्माण होत असून, जनजीवन पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकीकडे असे उत्साह वाढवणारे चित्र दिसत असतानाच जगातील काही देशांमध्ये अद्याप लस पोहोचलीच नसल्याचं दुर्दैवी चित्रही समोर आलं आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लशीची निर्मिती केली जात आहे. मात्र लशीचं वितरण समान प्रमाणात होत नसल्याचं दिसत आहे. श्रीमंत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे तर अनेक देशांमध्ये अद्याप लसीकरण सुरू देखील झालेलं नाही. तज्ज्ञांचे मत काय आहे? एप्रिलच्या अखेरीस जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organiszation-WHO) प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसेस यांनी श्रीमंत देशांमध्ये जवळपास 82 टक्के लशी तर गरीब देशांकडे फक्त 0.3 टक्के लशी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. अनेक श्रीमंत देशांमध्ये कोणती लस सर्वात चांगली आहे यावरून वाद सुरू आहे, तर त्याचवेळी आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांना कोणताही पर्याय नसल्याचं काही अहवालांवरून स्पष्ट झालं आहे. चाडमधील आरोग्य कर्मचारीदेखील लशीविना एक तृतीयांश भाग सहाराच्या वाळवंटात येणाऱ्या मध्य अफ्रिकेतील चाड (CHAD) या एका अत्यंत गरीब देशात अद्याप लस पोहोचलेलीदेखील नाही. तिथले डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी यांनादेखील लस मिळालेली नाही. त्यांच्यापर्यंत लस कधी पोहोचेल हेदेखील त्यांना माहिती नाही. लसीविनाच ते कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार करत आहेत. हे देश आहेत लसीपासून वंचित जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत जवळपास डझनभर देशांमध्ये लशीची एक खेपदेखील पोहोचलेली नाही. यातील बहुतेक देश आफ्रिकी आहेत. बुर्किना फासो, टान्झानिया, बुरुंडी आणि इरिट्रिया हे यापैकी काही देश आहेत. या देशांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठा नसला तरी आहे तेवढा प्रादुर्भावदेखील या देशांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनवण्यासाठी पुरेसा आहे. लसीकरण झालेलं नसल्यानं इथले उद्योजक व्यापार व्यवसायासाठी दुसऱ्या देशातदेखील जाऊ शकत नाहीत. तसंच इथली आरोग्य व्यवस्थाही कमकुवत असल्यानं आहे ती यंत्रणा अति ताणामुळे कोसळू नये यासाठी इथं कडक टाळेबंदी लावण्यात आली आहे. कोवॅक्स काय करीत आहे**?** गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लस पोहोचवण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्यानं कोवॅक्स (Covax) हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मात्र त्याचाही फार उपयोग झाल्याचं दिसत नाही. आजही अनेक गरीब देश विशेषतः आफ्रिकी देश लशीची प्रतीक्षाच करत आहेत. त्याचवेळी अशी भीती देखील आहे की कोरोना विषाणूत सतत होत असलेल्या परिवर्तनामुळे यावर कोणती लस प्रभावी ठरले याबाबतही साशंकता आहे. लस साठवण्याची उत्तम व्यवस्था नाही या देशांपर्यंत लस पोहोचली तरी तिचा साठा करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य यंत्रणा नसल्यानं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. ही लस अत्यंत कमी तापमानात साठवावी लागते. फारच कमी आफ्रिकन देशांमध्ये ही सुविधा आहे. तसंच या देशांमध्ये सरासरी तापमान सुमारे 44 अंश सेल्सिअसपर्यंत असतं त्यामुळे लस साठवणं आणखी कठीण ठरतं. हैतीच्या परिस्थिती : हैतीचं (Haiti) उदाहरण बघितलं तर या देशांची अवस्था किती बिकट आहे, याची कल्पना येईल. 1 कोटी 10 लाख लोकसंख्या असलेल्या या देशात अजून लस पोहोचलेली नाही. सतत नैसर्गिक आपत्तीना तोंड देणाऱ्या या देशाला कोरोनाच्या संकटानं अधिकच दुर्बल बनवलं आहे. इथले आरोग्य कर्मचारीही लसीकरणाशिवायच लोकांवर उपचार करत आहेत. साठवण यंत्रणा नसल्यानं स्वतःच लस घेण्यास दिला नकार कोवॅक्स उपक्रमाअंतर्गत हैतीला अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या (AstraZeneca) लशीचे 7 लाख 56 हजार डोस देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र या देशानेच ते स्वीकारण्यास नकार दिला. इंडिया टुडेनं, दिलेल्या वृत्तानुसार ही लस साठवण्याची क्षमता उपलब्ध नसल्याचं इथल्या सरकारनं सांगितलं असून, एकच डोस असलेली लस दिल्यास अधिक सोयीचं ठरेल असंही या देशानं म्हटलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात