नवी दिल्ली, 30 जुलै : कोरोनाच्या व्हायरसचं (corona virus) काही काळानंतर सातत्यानं म्युटेशन (mutation) होत असून नवनवे व्हेरिअंट (Varient) तयार होत आहेत. सध्या प्रचलित असलेला डेल्टा प्लस (Delta Plus) हा आतापर्यंत सर्वात घातक व्हेरिअंट असून त्याचा वेग कल्पनेपेक्षाही अधिक असल्याचं अमेरिकेतील एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे. अमेरिकेच्या आरोग्य प्राधिकरणानं जाहीर केलेल्या माहितीचा आधार देत अमेरिकेतील माध्यमांनी याबाबतची बातमी दिली आहे.
काय आहेत तपशील
अमेरिका आरोग्य प्राधिकरणानं कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटबाबतची संवेदनशील माहिती मिळवली आहे. ती अद्याप प्रकाशित झाली नसली तरी त्यातील काही मजकूर माध्यमांना मिळाला असून त्याचे तपशील धक्कादायक आहेत. यातील संशोधनानुसार कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता तेवढीच असते, जेवढी लस न घेतलेल्या नागरिकांना असते. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांनीदेखील तितकीच काळजी घेणं गरजेचं असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
वेगवान प्रसार
डेल्टा प्लस हा आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा विषाणू असल्याचं सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल वार्लेस्की यांनी म्हटलं आहे. लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या नागरिकांच्या घशात प्रवेश करणारा कोरोनाचा विषाणू तेवढाच काळ राहत असल्याचं त्यांनी मान्य केलं. सार्स, इबोला यासारख्या आजारांप्रमाणे कोरोनाचा विषाणूदेखील वेगाने पसरत असल्याचं निरीक्षण डॉ. वार्लेस्की यांनी नोंदवलं आहे.
चिंता वाढली
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनादेखील या व्हायरसची लागण होत असल्यामुळे वैज्ञानिकांची चिंता वाढली असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यत कोट्यवधी लोकांचं जगभरात लसीकरण झालं असलं, तरी त्या नागरिकांनादेखील नव्या व्हेरिअंटपासून तितकाच धोका असल्याचं सांगितलं जात आहे. तर काही शास्त्रज्ञांच्या मते लस घेतलेल्या नागरिकांना नव्या व्हेरिअंटची लागण झाली, तरी त्यांना लस न घेतलेल्यांच्या तुलनेत कमी त्रास होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus symptoms