मुंबई, 20 जुलै : राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत स्वत: अस्लम शेख यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘माझा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तसंच मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनीही त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो. कोरोनाची लागण झाली असली तरीही मी माझ्या राज्यासाठी घरून काम करणार आहे,’ असं ट्वीट अस्लम शेख यांनी केलं आहे.
दरम्यान, राज्यात याआधीही अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर काही नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस आणखीनच वाढत आहे. रविवारी राज्यात कोरोनाच्या 9518 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. रविवारी 3906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.62 टक्के असून आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 69 हजार 569 झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 15 लाख 64 हजार 129 नमुन्यांपैकी 3 लाख 10 हजार 455 नमुने पॉझिटिव्ह (19.55 टक्के) आले आहेत. राज्यात 7 लाख 54 हजार 370 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 45 हजार 846 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.