नवी दिल्ली, 9 मे : आई आणि मूल या जगातल्या सर्वांत सुंदर आणि अमूल्य नात्याचं सेलिब्रेशन करणारा दिवस म्हणजे (Mother’s Day) मदर्स डे. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस जगातल्या अनेक देशांत साजरा केला जातो. म्हणजे उद्या, नऊ मे रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. यंदाच्या मदर्स डेवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये (Corona Pandemic) अनेक डॉक्टर्स जीव धोक्यात घालून काम करत आहेत आणि त्यात महिलांची संख्याही मोठी आहे. एकीकडे आपल्याला संसर्ग होण्याची भीती, आपल्यामुळे आपल्या लाडक्या मुलांना संसर्ग होण्याची भीती अशा वातावरणातही त्या काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर, उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, पारस हॉस्पिटल, बेबीज अँड अस फर्टिलिटी अँड आयव्हीएफ सेंटर, कोलंबिया एशिया हॉस्पिटल या हॉस्पिटल्समध्ये कार्यरत असलेल्या काही डॉक्टर मदर्सशी (Doctor Mothers) एएनआय या वृत्तसंस्थेने संवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. गुरुग्रामच्या पारस हॉस्पिटलमधल्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख पद्मश्री डॉ. अलका कृपलानी (Dr Alka Kripalani) यांनी सांगितलं, ‘जग आज ज्या आव्हानाला सामोरं जात आहे, ते माझ्या आठवणीत तरी खूपच कठीण आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाचा विचार करता ते अधिक आव्हानात्मक आहे. या स्थितीत काम करणं कठीण असलं, तरी माझ्या देशवासीयांना माझं प्राधान्य आहे. डॉक्टर म्हणून रोजचा दिवस आमच्यासाठी नवा धडा घेऊन येतो; पण माझ्या कुटुंबापासून, मुलांपासून दूर नेतो. डॉक्टर म्हणून आम्ही सगळं व्यवस्थित करतो; पण आई-वडील म्हणून हा खूपच विचित्र अनुभव आहे. पण न्यू नॉर्मल स्वीकारणं आवश्यक आहे.’ मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलच्या (Lilavati Hospital)स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रिश्मा पैसांगतात, ‘डॉक्टर आणि आई म्हणून या काळात काम करताना सद्सद्विवेकबुद्धी पणाला लागते. अशी परिस्थिती येते, की एकाच वेळी पेशंटकडे आणि कुटुंबाकडेही लक्ष द्यावं लागतं; पण आम्ही रुग्णसेवेची शपथ घेतलेली असल्यामुळे आधी रुग्णांनाच प्राधान्य देतो. त्यात मी कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची आई आहे.’ ‘कोरोना काळामुळे आई आणि मुलातलं नातं अधिक खुललं. आई म्हणून मला वाटणारी काळजी सोबत असतेच; पण त्याचा मी माझ्याडॉक्टर म्हणून असलेल्या कर्तव्यांवर परिणाम होऊ देत नाही. माझ्या मुलाच्या कामाचा मी आदर करते. तसंच, आम्ही या आजाराबद्दल चर्चाही करतो,‘असंही डॉ.पै म्हणाल्या. उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधल्या ज्येष्ठस्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अक्ता बजाज म्हणाल्या, ‘या पेशात आल्यानंतर गेली 20 वर्षं आपत्कालीन परिस्थिती हा माझ्या रोजच्या जगण्याचाच भाग झालाय. रुग्णसेवेलाच माझं प्राधान्य असतं. गेली दोन वर्षं मी माझ्या मुलांचे वाढदिवस मिस करतेय. मी स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. ज्या महिला नऊ महिने आपल्यावरविश्वास टाकतात, त्यांच्या बाळंतपणावेळी त्यांना सर्वोत्तम सेवा देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती असली, तरी मी रुग्णसेवेलाच प्राधान्य देते.’ पालम विहार इथल्या कोलंबिया एशिया हॉस्पिटलच्या ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शर्मिला सोळंकी म्हणाल्या, ‘मी कोविड विभागात काम करत असल्यामुळे माझ्या इतकाच ताण माझ्या मुलालाही असतो. मी वेळेवर खातेय की नाही, मी सुरक्षित आहे की नाही, याबद्दल त्याला काळजी वाटते. सुरुवातीला सेल्फ क्वारंटाइनचे नियम कडक होते, तेव्हा कुटुंबाशीही केवळ व्हिडिओ कॉल्सद्वारेच बोलता येई. पण माझ्या मुलाने कठीण परिस्थितीतमला समजून घेतल्याचा आनंद मोठा आहे. त्यामुळे मला समजून घेणाऱ्या मुलाची आईअसल्याचा अभिमान आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







