उज्जैन, 17 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेनंतर संपूर्ण देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास प्रत्येक राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यास आरोग्य यंत्रणा कमी झाल्याचं अनेक ठिकाणी उघड झालं आहे. महाराष्ट्राच्या शेजाराच्या मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) देखील कोरोनामुळे परिस्थिती झपाट्यानं बिघडत आहे. या परिस्थितीपुढे हतबल झालेल्या एका 23 वर्षांच्या तरुणीनं ‘मला उपचारासाठी मदत करा’ अशी मागणी थेट मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना केली आहे. काय आहे प्रकरण? प्रेक्षा दुबे, असं या 23 वर्षांच्या तरुणीचं नाव आहे. उज्जैनच्या चरक हॉस्पिटलमधील कोव्हिड वॉर्डात ती जीवन-मरणाची लढाई लढत आहे. डॉक्टरांनी तिच्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir injection) शिफारस केली आहे. मात्र हे इंजेक्शन सरकारी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे तिचा लहान भाऊ कोरोना संक्रमणाच्या काळात सगळीकडं इंजेक्शन मिळवण्यासाठी वणवण फिरत आहे. मध्य प्रदेश सरकारनं 16 एप्रिल रोजी 9768 रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतरही मध्य प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रेक्षा उपचार घेत असलेल्या भागातील नोडल अधिकाऱ्यानं आमच्याकडं 15 इंजेक्शन आली होती, ती देखील आता संपली आहेत, असं स्पष्ट केलंय. त्यामुळे प्रेक्षानं आता थेट मुख्यमंत्र्यांनाच व्हिडीओच्या माध्यमातून हे इंजेक्शन पुरवण्याची विनंती केली आहे. प्रेक्षाचा विनंती करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे.
( जगाला लसीचा पुरवठा करणाऱ्या भारतावर का आली लस आयात करण्याची वेळ? वाचा कारण ) “मला डॉक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शनची शिफारस केली आहे. एक इंजेक्शन मला देण्यात आलेलं आहे, पण अजून दुसरं इंजेक्शन मिळालेलं नाही. डॉक्टरांनी हे इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये नसल्याचं सांगितलं आहे. माझ्या घरचे या इंजेक्शनच्या शोधासाठी सर्वत्र फिरत आहेत. या हॉस्पिटलमधील अनेक जण हे इंजेक्शन मिळत नसल्यानं त्रस्त आहेत. तुम्ही कृपया आम्हाला मदत करा. काहीही करुन आम्हाला हे इंजेक्शन मिळेल याची व्यवस्था करा,” असं साकडं प्रेक्षानं मुख्यमंत्री चौहान यांना घातलं आहे.