नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : भारत (India) लवकरच युनायटेड किंगडम (UK)मधून येणाऱ्या नागरिकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करू शकतो. यापूर्वी, ब्रिटनने कोविशील्ड लसीसाठी पात्र भारतीय नागरिकांच्या आगमनानंतर चाचणी आणि विलगीकरणात ठेवण्याचे निर्बंध रद्द केले आहेत. आता असं सांगितलं जातंय की, ब्रिटनच्या या हालचालीनंतर भारत सरकार लवकरच ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करू शकतो. एएआयच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
ब्रिटनने गुरुवारी जाहीर केल्यानुसार 11 ऑक्टोबरपासून भारतासह एकूण 47 देशांमधून यूकेमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड निर्बंध पूर्णपणे संपुष्टात आणले जाणार आहेत. याबाबत असंही सांगितलं जात आहे की, यूके ब्रिटनमध्ये पोहोचणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असलेल्या देशांची लसीकरणाती स्थिती तपासणार आहे.
भारतानं कडक भूमिका घेतली अन् नियम बदलले
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या भारतीय प्रवाशांनी कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना यापुढे यूकेमध्ये कोणत्याही प्रकारच्या विलगीकरणात ठेवण्याची गरज भासणार नाही. यापूर्वी ब्रिटनमध्ये पूर्णपणे लसीकरण होऊन गेलेल्या लोकांनाही दहा दिवस विलगीकरणात ठेवण्यात यावे, अशा कडक सूचना देण्यात आल्या होत्या.
हे वाचा - आता घरातही सुरू करू शकता मत्स्यपालन; या Business Idea मुळे थेट लाखोंमध्ये कमाई
ब्रिटनचे हे कठोर कोरोना प्रवास नियम पाहता भारतानेही ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी एक मार्गदर्शक सूचना जाहीर केली होती. भारताने ब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्याचा नवीन नियम बनवला होता.
47 पेक्षा जास्त देशांमधील कोविड निर्बंध संपुष्टात
भारताने कडक धोरण अवलंबल्याचा थेट परिणाम ब्रिटनवर झाला आणि गुरुवारी ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी भारतीय प्रवाशांसाठी अलगीकरणाचे नियम काढून टाकण्याची घोषणा केली. कोविशिल्ड किंवा ब्रिटनने मान्यता दिलेल्या कोणत्याही लसीचे डोस घेतले असलेल्या भारतीय नागरिकांना ब्रिटनमध्ये प्रवेश केल्यानंतर आता विलगीकरणात राहावे लागणार नाही, सोमवारपासून हे निर्बंध काढून टाकले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. भारताबरोबरच आता ब्रिटन, ब्राझील, घाना, हाँगकाँग, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि तुर्कीसह 47 पेक्षा जास्त देशांतील प्रवाशांसाठी कोविड निर्बंध रद्द करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, United kingdom