नवी दिल्ली, 10 मार्च: कोरोना संसर्गाच्या (Corona) पार्श्वभूमीवर चेहऱ्यावर योग्य पध्दतीने मास्क (Mask) न घालता विमान प्रवास करणारा प्रवासी मास्क वापरत नसेल तर उड्डाणापूर्वीच त्याला विमानातून खाली उतरवून द्यावं आणि प्रवासादरम्यान कुणी या नियमाचा भंग केला तर त्यावर केबिन क्रुने (Cabin crew) कारवाई करावी, अशा सूचना दिल्ली हायकोर्टाने (Delhi High court) दिल्या आहेत.
याबाबत दिल्ली हाय कोर्टाने डीजीसीए आणि सर्व विमान कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. न्यायमुर्ती सी. हरि शंकर यांनी 5 मार्चला दिल्ली ते कोलकतादरम्यान एअर इंडियाच्या (Air India) विमानातून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक प्रवाशांनी हनुवटीच्या खाली मास्क घातले आहेत, तर काही प्रवासी मास्क न लावण्यासाठी अट्टहास करीत असल्याचे दिसून आले. प्रवाशांचे अशा प्रकारचे वर्तन पाहून त्यांनी स्वनिरीक्षणा आधारे स्वधिकारातून यासंदर्भातून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
याबाबत न्यायमुर्ती शंकर यांनी स्पष्ट केलं की सर्वांनी शासकीय निर्देशानुसार मास्क वापरावेत. फक्त तोंड झाकून घेत हनुवटीखाली मास्क न घेता, तोंड, नाक पूर्णपणे मास्कने झाकून घ्यावे.
यासंदर्भात केबिन क्रूकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सर्व प्रवाशांना मास्क लावण्याबाबत सांगितले होते. पण प्रवासी या नियमाचे पालन करीत नसल्याने आम्ही असहाय्य आहोत. यावर कोर्टाने नमूद करताना म्हटलं आहे की विमान उड्डाणापूर्वी कोणताही प्रवासी नियमांचे पालन करण्यास तयार नसेल तर विलंब न करता त्यास विमानातून खाली उतरवावे.
जर एखाद्या प्रवाशास विमानात एकापेक्षा जास्त वेळा आठवण करुन देऊनही तो प्रवासी नियमांचे पालन करीत नसेल तर त्या प्रवाशांवर कारवाई करावी. तसेच त्या प्रवाशाला कायमस्वरुपी किंवा ठराविक दीर्घ कालावधीसाठी नो-फ्लाय (No-fly Regime) मोडवर ठेवावे.
तसेच कोर्टाने डीजीसीएला आपल्या संकेतस्थळावर देशातंर्गत प्रवासाकरिता प्रवासी आणि केबिन क्रूसाठी असलेली मार्गदर्शक तत्वे, नियम आणि सूचना ठळकपणे प्रदर्शित करण्याची सूचना केली आहे. याबाबत सूचना किंवा वेबलिंक या एका क्लिकवर उपलब्ध होतील तसेच त्या विविध फॉन्टमध्ये ब्लिंक होतील किंवा उपलब्ध साधनांमध्ये सहज दिसतील, अशी खात्री डिजीसीएने दिली.
(
हे वाचा:Corona Vaccine: लसीचे महिलांवर होताहेत सर्वाधिक साइड इफेक्ट्स )
न्यायाधीशांनी दिलेल्या निर्देशानुसार, सध्याच्या कालावधीत प्रवाश्यांना नेहमीच मास्क लावणे बंधनकारक आहे. याबाबत दक्षता न घेतल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. विमानात येणारे सर्व प्रवासी मास्क लावत आहेत का, नियमांचे पालन (Protocol) करत आहेत का याची नियमित तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.