अनिल कुमार, शैलेंद्र वांगू/नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : भारतात कोरोना रुग्णांची (India coronavirus) संख्या 31 लाखांच्या पार गेली आहे. तर 58 हजार पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोरोना लस (Corona Vaccine) मिळण्याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. यासाठी भारत सरकारही प्रयत्नशील आहे. भारतात सध्या तीन कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे. दरम्यान आता रशियाच्या लशीसाठीदेखील भारत प्रयत्नशील आहे.
रशिया आणि भारतामध्ये कोरोना लशीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आयसीएमआरने (ICMR) दिली आहे. या लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत असल्याने भारत जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाने आपल्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) लशीबाबत भारताशी चर्चा केली आहे. भारतातील रशियाचे राजदूत निकोलॉय कुदाशेव यांनी बायो टेक्निकल विभाग आणि आयसीएमआरशी संपर्क केला आहे. रशियाच्या राजदूतांनी भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन, बायो टेक्निकल विभागाचे सचिव रानू स्वरूप आणि आयसीएआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांना रशियाच्या लशीबाबत माहिती आणि अहवाल दिला आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यासहदेखील रशियाच्या राजदूतांची बैठक झाली आहे.
हे वाचा - ‘मास्क’ न वापरणाऱ्या लोकांमुळेच भारतात पसरतोय कोरोना, ICMRने दिला गंभीर इशारा
सूत्रांच्या मते लशीबाबत सर्वात महत्त्वाची माहिती मिळणं बाकी आहे. रशियातही भारतीय राजदूत स्पुतनिक व्ही कोरोना लस तयार करणाऱ्या गॅमालिया नॅशनल सेंटर फॉर एपिडोमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीच्या संपर्कात आहेत. जेणेकरून भारताला या लशीबाबत जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल.
स्पुतनिक व्ही या लशीचं सुरुवातीचे ट्रायल यशस्वी झालं असून ही लस सुरक्षित असल्याचा दावा रशियाने केला आहे. रशिया तब्बल 40,000 लोकांना ही लस देणार आहे, असं वृत्त रॉयटर्सने दिलं होतं.
हे वाचा - कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम; अहवाल पाहून संशोधकांनाही बसला धक्का
दरम्यान भारतात तीन लशींवर सध्या काम सुरू आहे. यापैकी दोन देशात तयार करण्यात आलेल्या भारत बायोटेक आणि झेडस कॅडिला यांनी बनवली आहे. तर एक ऑक्सफोर्ड विद्यापीठानं तयार केलेली आहे. ज्यामध्ये भारतातील सीरम इन्स्टिट्यूटशी भागीदारी केली आहे. आता भारत रशियाशीदेखील भागीदारी करणार आणि रशियन लशीचंही भारतात उत्पादन होणार आहे, याकडे लक्ष लागलं आहे.