नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : श्वास लागणं, सततचा खोकला आणि थकवा ही कोविडची (Corona symptoms) सामान्य लक्षणं आहेत. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक घरीच बरं होण्यासाठी प्रयत्न करत असतात. कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपिस्ट हृदय आणि श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या लोकांना विविध प्रकारच्या आजारांचा सामना करण्यास आणि त्यातून बरे होण्यास मदत करतात. त्यांनी काही उपाय सांगितले आहेत.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज असते. मात्र, कोविडमधून बरे होत असताना साधे, हलके व्यायाम केल्यानं तुमची आजारपणाची लक्षणं दूर होऊन तब्येत सुधारण्यास मदत होऊ शकते. वृद्ध, लठ्ठपणा किंवा मधुमेह किंवा हृदय (हृदय/रक्ताभिसरण) आणि श्वसन (फुफ्फुसाचे) आजार असलेल्या लोकांमध्ये कोविडची लक्षणं दिसण्याची शक्यता जास्त असते. त्यांना घरच्या घरी केलेल्या साध्या, हलक्या व्यायामाचा (exercise) विशेष फायदा होईल.
कोरोना संसर्ग झाला असताना घरी राहून श्वासोच्छवासाचे कोणते व्यायामप्रकार करता येतील?
1- सहज श्वास घ्या-
हा व्यायाम उपयुक्त आहे. जर तुम्हाला श्वासोच्छवास कमी झाल्यासारखं वाटत असेल तर, स्थिर आणि आरामदायक स्थितीत जा. तुमचं खांदे खाली करा आणि हळूहळू श्वास घ्या, तुमचे ओठ घट्ट करा (जसं तुम्ही छोट्या नळीतून हवा सोडत आहात) हळू हळू आणि स्थिरपणे तुमच्या तोंडातून श्वास सोडा आणि एक मिनिट व्यायामाची पुनरावृत्ती करा. खुल्या खिडक्या असलेल्या खोलीत आरामदायक स्थितीत हा व्यायाम करा.
हा व्यायाम तुम्ही तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा करू शकता. पण जर तुम्हाला चक्कर येत असेल तर थांबा. कारण, सतत जास्त श्वास घेतल्यानं डोकं दुखतं.
2-खोल श्वास घेणं-
खोल श्वास घेऊन शरीरात ऑक्सिजन घेण्याचं प्रमाण सुधारल्यानं तुमचे मज्जातंतूही शांत होऊ शकतात. खांदे आरामदायक स्थितीत करा. दोन ते तीन सेकंद नाकातून दीर्घ श्वास घ्या. तीन सेकंद आपला श्वास रोखून धरा. तुम्हाला तुमच्या नाकातून किंवा तोंडातून श्वास घेता येत असेल तर, यापैकी जे अधिक सोयीस्कर असेल ते करा. एका मिनिटासाठी हा व्यायाम पुन्हा पुन्हा करा. हे करताना चक्कर येत असेल तर थांबा.
या व्यायामानंतर तुम्हाला खोकला येऊ शकतो आणि कफ देखील बाहेर येऊ शकतो. तुम्हाला खोकला असल्यास, तोंड टिश्यूनं झाकून घ्या आणि प्रत्येक वापरानंतर लगेच बंद पिशवीत टिश्यू टाकून द्या. हे केल्यानंतर हात चांगले धुवा.
3-पोटावर झोपा (जर तुम्ही झोपू शकत असाल तर)-
पोटावर झोपण्याचे फायदे तुम्ही इतरांकडून ऐकले असतील. शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी श्वासोच्छवासाच्या व्यायामादरम्यान पोटावर झोपावं. रुग्णालयात अनेकांना या स्थितीत झोपण्यास सांगितलं जातं. मात्र, हे सर्वांना शक्य नसतं. कमीत कमी 30 मिनिटं पोटावर झोपणं आवश्यक असतं. काही लोकांना ते अत्यंत अस्वस्थ वाटू शकतं. विशेषतः जर ज्या लोकांना मान आणि पाठीच्या खालच्या भागात दुखत असेल, अशा लोकांसाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम करताना सरळ बसणं किंवा एका बाजूला झोपणं हा एक चांगला पर्याय असू शकतो.
हे वाचा -
Fainting: काही लोक अचानक बेशुद्ध कसे होतात? जाणून घ्या त्यापाठीमागील ही मोठी कारणं
पोटावर झोपण्यासाठी टिप्स
जेवणानंतर पोटावर झोपण्याचा प्रयत्न करू नका.
झोपण्यासाठी एक घन पृष्ठभाग निवडा. मऊ पलंगावर पोटावर झोपणे अधिक अस्वस्थ करू शकतं.
तुम्ही पहिल्यांदा असा प्रयत्न करत असाल तर, तुमच्यासोबत कोणीतरी असलेलं चांगलं ठरेल.
क्रॉस-इन्फेक्शन होऊ नये, यासाठी तुम्ही आणि तुमचा सहाय्यक अशा दोघांनीही मास्क घालावा.
एका वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत असा प्रयत्न करू नका.
4- नियमित चाला-
तुलनेनं सौम्य कोविड लक्षणं असलेल्या लोकांना इतर लक्षणं दूर झाल्यानंतरही थकल्यासारखं वाटू शकतं. यासाठी दिवसभरात नियमितपणे साधे व्यायाम करा. दिवसभरात नियमित कामं करत रहा. चालण्याचा व्यायाम तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. किती वेळ आणि किती वेगानं चालावं हे व्यक्तीनुरूप आणि तिच्या लक्षणांनुसार बदलू शकतं.
हे वाचा -
Explainer: कोरोनाची लागण झाल्यावर कि लस घेतल्यावर; जास्त Antibodies नेमक्या कधी तयार होतात?
5-आणखी वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घ्या-
तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्याला छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं, चक्कर येणं, हातापायांत अशक्तपणा, भ्रमाची स्थिती, मनातला गोंधळ वाढणं, जागं राहण्यात अडचण येणं किंवा स्वत:ला इजा करण्याचे विचार मनात येत असल्यास तुम्हाला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. तुमची कोविड लक्षणं दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास, तुमच्या स्थानिक डॉक्टरांना भेटा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.