कोरोना लस घेतल्यावर 68 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू; देशात पहिल्याच घटनेची नोंद

कोरोना लस घेतल्यावर 68 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू; देशात पहिल्याच घटनेची नोंद

लसीकरणानंतर उद्भवलेल्या 31 गंभीर घटनांचा अभ्यास केला आणि यापैकी केवळ 1 मृत्यू हा लसीकरणामुळं झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. लसीकरणानंतर होणाऱ्या त्रासासंदर्भात माहिती घेण्यासाठी सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून: देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची (Vaccination In India) प्रक्रिया सध्या सुरू आहे. 16 जानेवारीपासून भारतात कोरोना प्रतिबंधत लसीकरण मोहीम सुरू झाली आणि आतापर्यंत सुमारे 26 कोटी लोकांना ही लस देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना नोंदली गेली आहे. सरकारकडून नेमलेल्या समितीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर उद्भवलेल्या 31 गंभीर घटनांचा अभ्यास केला आणि यापैकी केवळ 1 मृत्यू हा लसीकरणामुळं झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृतरित्या एका व्यक्तीचा मृत्यू कोरोना लस घेतल्यामुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे.

अहवालानुसार, 8 मार्च 2021 रोजी लसीकरणानंतर एका 68 वर्षीय व्यक्तीचा एनाफिलेक्सिसमुळं मृत्यू झाला. लसीकरणानंतर एखाद्या व्यक्तीला झालेल्या कोणत्याही त्रासाला AEFI म्हणजेच एडवर्स इवेंट फॉलोइंग इम्युनाइजेशन असे म्हटले जाते. सरकारकडून अशा AEFI च्या प्रकरणांसाठी एक समिती स्थापन केली आहे.

एईएफआयच्या 26,200 प्रकरणांची नोंद

कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर देशात पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. संबंधित रुग्णामध्ये अ‍ॅनाफिलेक्सिस आढळला. 3 प्रकरणे लसीच्या उत्पादनाशी संबंधित असल्याचे आढळले आहे. या 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू लस घेतल्यानंतर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एखाद्याला लसीचा असा साईड इफेक्ट झाला असण्याची शक्यता आहे. लसीच्या साईड इफेक्टमध्ये अॅलर्जी आणि एनाफिलेक्सिसचा समावेश आहे, असे समितीचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा म्हणाले. त्यांनी याबाबत मिरर नाऊला माहिती दिली आहे.

हे वाचा - …तर लसीकरणाला परवानगी नाही; Corona vaccination बाबत BMC च्या नव्या सूचना

कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर एईएफआय झाल्याच्या घटना एकूण लसीकरणाच्या केवळ 0.01 टक्के एवढ्या आहेत. तर यामुळं मृत्यू होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या एईएफआयच्या आकडेवारीनुसार 16 जानेवारी ते 7 जून दरम्यान 26,200 प्रकरणांची नोंद झाली आहे. एनाफिलेक्सिसच्या इतर 2 घटनांमध्ये 19 आणि 16 जानेवारी लसीकरण करण्यात आलेल्या दोन व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, उपचारानंतर ते बरे झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Published by: News18 Desk
First published: June 15, 2021, 3:33 PM IST

ताज्या बातम्या