3 वर्षात प्रत्येक भारतीयाचं लशीकरण होणार; तोपर्यंत स्वत:ला जपा !

3 वर्षात प्रत्येक भारतीयाचं लशीकरण होणार; तोपर्यंत स्वत:ला जपा !

कोरोना लस (Corona Vaccine) आल्यावरही प्रत्येकापर्यंत लस पोहोचायला तीन वर्ष लागतील असा दावा करण्यात येत आहे. तोपर्यंत कोरोनापासून स्वत:चा बचाव करणं महत्वाचं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 नोव्हेंबर: पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना विषाणूवरील लस भारतात उपलब्ध झाली तरी कोणताही आजार नसणाऱ्या निरोगी प्रौढांना ती 2022 पूर्वी मिळण्याची शक्यता कमी आहे. अशी माहिती, ‘टिल वुई विन : इंडियाज फाईट अगेन्स्ट द कोविड -19 पॅनडेमिक’ या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.  ‘एआयआयएमएस’चे संचालक रणदीप गुलेरिया, आरोग्य सेवा आणि सार्वजनिक आरोग्य धोरण क्षेत्रातले तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया आणि प्रसिद्ध लस संशोधक डॉ. गगनदीप कांग यांनी हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पूर्व नोंदणीसाठी ऑनलाइन उपलब्ध असून, 10 डिसेंबरपासून दुकानांमध्येही उपलब्ध होईल.

लस आल्यानंतर ही आधी कुणाला मिळेल? याचे उत्तर सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या विभागात देण्यात आले आहे. त्यानुसार, ही लस देताना आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य गंभीर आजार असणाऱ्या लोकांना प्राधान्य दिले जाईल. प्रत्येक देशात हा प्राधान्यक्रम वेगळा असेल, असं या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. काही लसी 2021च्या सुरुवातीला उपलब्ध होतील, असंही यात म्हटलं आहे.

सर्वांना लस देण्यासाठी आवश्यक साठा उपलब्ध होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल असंही या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. आगामी काळात साथरोगांशी कसा लढा द्यावा, याबाबत भारताने कोविड 19 शी दिलेला लढा वाचकांना मार्गदर्शक ठरेल, असा दावा लेखकांनी केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी अलीकडेच पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत 20 ते 25 कोटी लोकांना लस देण्याचा विचार जाहीर केला होता.

मृत्यूचे प्रमाण कमी करायचे असेल तर आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्याने लस देण्याचा निर्णय योग्य आहे. संसर्ग रोखायचे उद्दिष्ट असेल तर तरुण मुले जी इतरांच्या अधिक संपर्कात येतात त्यांना लस देण्याचा विचार केला पाहिजे, असं या लेखकांनी म्हटलं आहे. भारत बायोटेक, झायडस कॅडिला, पनाशिया बायोटेक, मिनवॅक्स आणि बायालॉजिकल-ई या देशातील कंपन्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस निर्मितीसाठी काम करत आहेत.

काही लशी उपलब्ध झाल्या तर आपल्याला त्याची परिणामकारकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करता येईल, असंही या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. जेव्हा 70 ते 90 टक्के लोक संसर्गजन्य आजाराशी प्रतिकार करू शकतात तेव्हा हर्ड इम्युनिटी निर्माण होते. पेंग्विन प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या 338 पानी पुस्तकाची किंमत 298 रुपये आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 24, 2020, 7:21 PM IST

ताज्या बातम्या