मुंबई 13 जून: आजही राज्यात 3427 नवे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 568वर गेली आहे. तर गेल्या दिवसभरात 113 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या मृतांची संख्या 3830 वर गेली आहे. आजही मुंबईत सर्वाधिक 69 मृत्यू मुंबईत झालेत तर पुण्यात 10 मृत्यू झाले. सर्वात जास्त रुग्णही मुंबईतच सापडले असून त्यांची संख्या दीड हजारांच्या वर आहे.
आज 1550लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत 49 हजार 346 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 04 हजार 887 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 658 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
नवे दर - राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त 2200 रुपये इतका दर आकारला जाणार आहे. तर रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
यासंदर्भात आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती गठीत केली होती. समितीने शासनाला अहवाला सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दरनिश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कम्युनिटी लागण - देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. दर दिवशी किमान दहा हजार रुग्णांची भर पडत आहे. परिस्थिती गंभीर असतानाच देशात व्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालं की नाही अशी चर्चा सुरू आहे.Indian Council of Medical Research (ICMR) चे संचालक बलराव भार्गव यांनी देशात ही स्टेज आली नाही असा दावा केला होता. भार्गव यांचा दावा तज्ज्ञांनी खोडून काढला असून देशात व्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालं हे सरकारने मान्य करावं असं म्हटलं आहे.
अनलॉकमुळे आता देशाच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. संख्या झापाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं हे स्पष्ट होतं असं मत AIIMSचे माजी संचालक एम.सी. मिश्रा यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे सरकारने हे मान्य करून तातडीने उपाययोजना कराव्यात असं मतही त्यांनी त्यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.