नवी दिल्ली, 14 जून : देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट आता काहीशी नियंत्रणात असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसत आहे. सरकारने लसीकरणाची (Vaccination in India) गती वाढविली आहे. आता मुलांसाठी लसीकरण सुरू करण्याच्या सरकारच्या धोरणावर वेगानं काम सुरू आहे. मोदी सरकारने 12-18 वर्ष वयोगटातील 1 कोटी 30 लाख मुलांपैकी सुरुवातीला 80 टक्के लसीकरण वेगात करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी सरकारला दोन डोसच्या कोरोना लशीचे (Corona Vaccine) किमान 2 कोटी 10 लाख डोस उपलब्ध करावे लागणार आहेत.
'द इंडियन एक्सप्रेस' च्या एका अहवालानुसार 12-15 वर्षे वयोगटातील बालकांच्या वापरासाठी युरोपीय युनियनमध्ये फाइजरच्या mRNA लसीच्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतात मुलांसाठी कोवॅक्सिन तयार करण्यासाठी स्वदेशी क्षमतांचा वापर केला जावू शकतो. भारत बायोटेक (Bharat Biotech) कडून अद्यापही मुलांच्या लसीकरण चाचण्यांवर काम सुरू आहे. फायजरची लस तयार झालीच तरी ती देशात येण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत खात्री नसल्यानं मुलांसाठी स्वदेशी लस निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे.
या संदर्भात भारत बायोटेकच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कंपनी मोठ्या ऑर्डर पूर्ण करण्यास सक्षम आहे. हैदराबादमध्ये मुख्यालय असलेल्या या लस निर्माण कंपनीला 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवाक्सिन या लसीची चाचणी घेण्याची परवानगी मिळाली आहे. जर चाचण्या यशस्वी झाल्या तर ही लस मोठ्या प्रमाणात मुलांसाठी उपलब्ध होऊ शकेल.
एका अहवालानुसार, 80 टक्के लसीकरणाचे लक्ष्य ठेवून मुलांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी 1 कोटी 4 लाख मुलांच्या लसीकरणाच्या दृष्टीने लसीचे डोस उपलब्ध करावे लागणार आहेत. यासाठी लसींचे दोन डोस द्यायचे झाल्यास कमीत कमी 2 कोटी 8 लाख डोस लागतील. तीन डोसद्वारे लसीकरण करायचे असल्यास आणखीन जास्त लस उपलब्ध करावी लागेल.
हे वाचा - लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम; राज्यात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण
अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली की, फायझर कंपनीशी आम्ही सध्या चर्चेत आहोत. याक्षणी काहीही निश्चित नाही. ही लस कधी येते आणि त्या वेळी आमचे प्राधान्य काय यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भारतातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 25 कोटीहून अधिक जणांनाचे लसीकरण केले आहे. आपल्याला फायजरच्या 5 कोटी लसी मिळत आहेत. त्या कमी पडणार असून तोपर्यंत कोवॅक्सीनची लस निर्माण झाल्यास मोठी अडचण दूर होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aatmanirbhar bharat, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus