मुंबई, 28 एप्रिल : केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. 1 मेपासून सुरू होणार असलेल्या या टप्प्यात 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांना लस घेता येणार आहे. या टप्प्यासाठीची नोंदणी 28 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरू झाली असून, या वयोगटातील व्यक्तींनी को-विन (Co-WIN), तसंच आरोग्य सेतू (Arogya Setu) आदी अॅप्सवरून नोंदणी करून मगच लसीकरणाला जावं, असं सरकारने सांगितलं आहे. अद्यापही लसीकरणाच्या अनुषंगाने अनेक शंका लोकांच्या मनात आहेत. या पार्श्वभूमीवर, 'सीएनबीसीटीव्ही18'ने व्हॅक्सिनेशन गाइड प्रसिद्ध केलं आहे. अनेक शंकांचं निरसन त्यात करण्यात आलं आहे. बेंगळुरूतील डॉ. पी. एन. ढेकणे यांनी हे सल्ले दिले आहेत.
लस घेण्यापूर्वी
लसीकरणासाठी नोंदणी (Vaccination Registration): को-विन प्लॅटफॉर्म वापरून किंवा आरोग्य सेतू अॅपचा वापर करून नोंदणी करावी. 28 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजल्यानंतर 18 वर्षावरील व्यक्तींना यात नोंदणी करता येईल.
पुरेशी विश्रांती (Rest) : लस घेण्यापूर्वी शरीराला विश्रांती आवश्यक असते. लस घेण्यापूर्वी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तयार असणं आवश्यक असतं. लस घेण्याच्या आदल्या दिवशी किमान सहा ते आठ तास झोप घ्यावी. लस घेण्याच्या दिवशी जास्त व्यायाम करू नये.
स्टेरॉइड्स (Steroids) : तुम्हाला काही स्टेरॉइड औषधं सुरू असतील, तर लसीकरणापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, अतिसार अशी लक्षणं लस घेण्यापूर्वी दिसत असतील, तर आधी वैद्यकीय सल्ला घ्या.
आहार : प्रतिकारशक्तीला प्रोत्साहन देईल असा आहार घ्या. संतुलित आहार योग्य ठरेल. भरपूर पाणी पिणंही आवश्यक.
लस घेण्याच्या दिवशी :
सुरक्षितता: मास्क, ग्लोव्ह्ज, फेस शिल्ड घालून लसीकरणाला जा. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांची सुरक्षितताही राखली जाईल. आवश्यकतेनुसार सॅनिटायझरचा वापर करावा.
घट्ट कपडे नकोत : लस घ्यायला जाताना आरामदायी कपडे घालावेत. घट्ट कपडे घालू नयेत. तसंच लशीचं इंजेक्शन खांद्यावर घ्यायचं असल्याने त्याचा विचार करून कपडे घालावेत.
पाणी प्या (Hydration) : भरपूर पाणी प्यायल्यामुळे ताजंतवानं राहायला मदत होते. डिहायड्रेशन झालं तर थकल्यासारखं किंवा चक्कर आल्यासारखं वाटू शकतं.
सकारात्मक विचार (Positive Thoughts) : लस घेण्याच्या दिवशी तुम्हाला टेन्शन आलं असेल,तर सकारात्मक विचार करा, अशा विचारांच्या सान्निध्यात राहा. दीर्घश्वास घ्या किंवा शांत संगीत ऐका. तुम्ही तुमचं आणि आजूबाजूच्यांचं आयुष्य वाचवण्याच्या एक पाऊल जवळ जात आहात, याची आठवण स्वतःला करून द्या.
लस घेतल्यानंतर
स्वतःवर लक्ष ठेवा : लशीचे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता दुर्मीळ असते. तरीही लस घेतल्यानंतर स्वतःमध्ये कोणती लक्षणं जाणवत आहेत, यावर लक्ष ठेवावं. उलट्या, चक्कर येणं, अॅलर्जी, खाज सुटणं अशी गंभीर लक्षणं दिसत असतील, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
अल्कोहोल नको (No Alcohol) : याबद्दल नेमका अभ्यास झालेला नाही. तरीही लस घेतल्याच्या दिवशी मद्यपान करणं टाळावं. तरीही तुम्हाला करायचंच असेल, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि मर्यादित प्रमाणातच करावं.
वैद्यकीय सल्ला : कोणतीही गोळ्या-औषधं घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. पेनकिलर्ससुद्धा स्वतःच्या डोक्याने घेऊ नयेत.
पेनकिलर्स नकोत (No Painkillers) : तुम्हाला लसीकरणानंतर कोणतीही लक्षणनं दिसत नसतील, तर पेनकिलर्स घेणं टाळावं. त्यामुळे तुमच्या प्रतिकार यंत्रणेत ढवळाढवळ होऊ शकते आणि काही साइड इफेक्ट्स दिसू शकतात.
दुसऱ्या डोसची तयारी : पहिला डोस घेतल्यानंतर चार ते12 आठवड्यांच्या दरम्यान लशीचा दुसरा डोस घेणं गरजेचं आहे. डोस नेमका किती दिवसांनी घ्यायचा, यासाठी डॉक्टर्सचं मार्गदर्शन घ्यावं.
काळजी घेणं सुरूच ठेवावं : लस घेतली म्हणजे कोरोना संसर्गाचा धोका नाही असं समजू नये. मास्क आणि अन्य संरक्षक साधनांचा वापर करतच राहावा. सॅनिटायझेशनही करावं. तुम्हाला संसर्ग झाला नाही,तरी तुम्ही वाहक होऊ शकता, हे ध्यानात ठेवावं. त्यामुळे सर्वांनी एकमेकांचं रक्षण करावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus