नवी दिल्ली, 22 मे: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं (Coronavirus 2nd wave) देशभरात अक्षरशः थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचे (Corona cases) वाढते आकडे देशाची चिंता वाढवताना दिसत आहेत. देशात असं एकही राज्य उरलं नाही, ज्याला कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला नाही. मागील काही दिवसांपासून देशात कोरोना बाधित रुग्णांचा वाढता आलेख काहीसा मंदावला आहे. मात्र कोरोना विषाणूचा धोका अद्याप कायम आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट आणखी घातक ठरत असून आता लहान मुलंही कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. मागील केवळ दोन महिन्यांत कर्नाटकात 9 वर्षाखालील कोरोनाबाधित लहान मुलांची (Corona infection in children) संख्या तब्बल 40 हजारांवर पोहोचली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कर्नाटकात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं सरकारला झोप उडवली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकात 9 वर्षाखालील तब्बल 39846 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 10 ते 19 या वयोगटातील 1,05,044 मुलं कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. हा आकडा केवळ मागील दोन महिन्यांतला (18 मार्च ते 18 मे) आहे.
संबंधित आकडेवारीनुसार, कोरोना साथीचा उद्भाव झाल्यापासून मागील दीड वर्षात 17,841 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. तर 10 ते 19 या वयोगटातील कोरोनाबाधित मुलांची संख्या 65,551 एवढी होती. त्यामुळे कोरोना विषाणूची दुसरी लाट कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक घातक असल्याचं दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जवळजवळ दुप्पट संसर्गजन्य आहे. त्यामुळे आता लहान मुलांचं आरोग्य देखील धोक्यात येत असून देशाची चिंता वाढताना दिसत आहेत.
हे ही वाचा- कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट, WHO चा खुलासा
लेडी कर्झन हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीनिवास यांनी सांगितलं की, कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत धोकादायक पद्धतीनं पुढं जात आहे. जर घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असेल, तर दोन दिवसातच घरातील इतर सदस्यांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता लहान मुलंही कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. डॉ. श्रीनिवास पुढे म्हणाले की, जर घराच्या एखाद्या सदस्याला कोरोनाचा संसर्ग झाला, तर लहान मुलं प्रथम त्यांच्या संपर्कात येतात. त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच लहान मुलांपासून दूर रहाणं अत्यंत गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.