Home /News /coronavirus-latest-news /

तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार Corona Vaccine? लशीचा गुण कितपत? जाणून घ्या Covid-19 Shots Trials बद्दल सर्व काही..

तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार Corona Vaccine? लशीचा गुण कितपत? जाणून घ्या Covid-19 Shots Trials बद्दल सर्व काही..

भारतात सध्या 5 कोरोना लशींची (Corona vaccine) चाचणी सुरू आहे. यातली कुठली लस सर्वाधिक प्रभावी ठरली आहे, कुठल्या टप्प्यात कोण आहे.. जाणून घ्या भारतातल्या Covid लशीबद्दल सर्व काही..

    नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : Coronavirus हे नाव आपल्या कानावर पडल्याला आता 12 महिने पूर्ण झाले. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची घटना वर्षभराचा काळ लोटला आहे. चीनमधील वुहान प्रांतात वर्षभरापूर्वी पहिला कोरोना रुग्ण सापडला होता आणि त्यानंतर Covid-19 ही जागतिक महासाथ कशी झाली हे आपल्या डोळ्यासमोर आहे. आता जागतिक पातळीवर वैज्ञानिकांनी त्या त्या देशातल्या सरकारच्या मदतीने या आजारावर लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले असून कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. भारतातही कोरोना लशीच्या चाचण्या सुरू आहेत. यातल्या कोणत्या लशींची चाचणी कुठल्या टप्प्यात आहे, आपल्यापर्यंत लस पोहोचायला किती वेळ लागेल, कुठल्या लशीची परिणामकता किती या सगळ्याची एकत्र माहिती.. अनेक कंपन्यांनी लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले असून काही कंपन्यांना यामध्ये यश देखील आले आहे. कोरोनाच्या या लशी केवळ आजारापासून संरक्षण देत नसून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देखील उपयुक्त असल्याचा दावा करण्यात येत आहे. विविध प्रकारच्या मानवी चाचण्या clinical trials यशस्वी झाल्याचा देखील अनेक कंपन्यांनी दावा केला असून अंतिम डेटा अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही. भारतात कोणत्या लशीची चाचणी सुरू आहे आणि त्यापुढील आव्हाने काय आहेत? कोणती लस सर्वात प्रभावी आढळली आहे. न्यूज 18 ने यासंदर्भात आढावा घेतला असून आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत. भारतात सध्या किती कोरोना लशींची चाचणी सुरू आहे? भारतात सध्या 5 कोरोना लशींची चाचणी सुरू आहे. या सर्व लसींची विविध टप्प्यांची चाचणी सुरु आहे. यामध्ये यामध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या अ‍ॅस्ट्रॅझेन्का या लशीचा, भारत बायोटेक, कॅडिला, बायोलॉजिकल ई-बॅलोर कॉलेज ऑफ मेडिसिन आणि गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूट, मॉस्कोया लसींचा समावेश आहे. कोणत्या भारतीय कंपन्यांनी परदेशी कंपन्यांबरोबर या चाचणीसाठी करार केला आहे ? अनेक भारतीय कंपन्यांनी कोरोना लसीच्या विकासासाठी परदेशी कंपन्यांशी करार केला आहे. यामध्ये क्लिनिकल ट्रायल आणि लसीच्या उत्पादनासाठी करार करण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने परदेशी कंपनीबरोबर करार केला आहे. त्याचबरोबर डॉ. रेड्डीज लॅबने देखील रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या मानवी चाचणीसाठी करार केला आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅझेन्का, कोडगेनिक्स आणि नोव्हाव्हॅक्स लस तयार करण्यासाठी करार केला आहे. सीरिम ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राझेन्का लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करीत आहे. ब्लूमबर्ग न्यूजच्या वृत्तानुसार,वर्षाच्या अखेरीस 100 मिलियन डोस तयार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. त्याचबरोबर ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेक लसीची चाचणी करण्यासाठी देखील त्यांनी करार केला आहे. हैदराबादमधील बायोलॉजिकल ई लि., तसेच अमेरिकेतील डायनाव्हॅक्स टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन आणि ह्यूस्टन, टेक्सास येथील बेल्लर कॉलेज ऑफ मेडिसिन यांनी करार केला आहे. बायोलॉजिकल ई च्या वेबसाइटनुसार कंपनीने मानवी चाचणीसाठी जानसेन फार्मास्युटिकलशी करार केला आहे. हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाबरोबर गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या स्फुटनिक व्ही लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या करण्यासाठी करार केला आहे या चाचण्यांची (vaccine trials) प्रगती काय ? भारत बायोटेक लिमिटेड आणि इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या वतीने कोवॅक्सिनच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या 1 नोव्हेंबरपासून भारतातील 2 केंद्रांवर सुरू झाल्या आहेत. यामध्ये 26 हजार स्वयंसेवकांना या लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारतातली ही सर्वात मोठी चाचणी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 28 दिवसांच्या अंतरात स्वयंसेवकांना या लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत. सिरम इन्स्टिटूने ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेन्काच्या मदतीने पुण्यात विकसित केलेल्या कोविशील्ड या लसीची तिसरी चाचणी पूर्ण केली आहे. सीरमने या लसीचे 4 कोटी डोस देखील तयार केले आहेत. डीसीजीआय, आयसीएमआर रिस्क मॅन्युफॅक्चरिंग अँड स्टॉकपाईलिंग परवान्याअंतर्गत लशीचे 4 कोटी डोस तयार केल्याची माहिती कंपनीने मागील आठवड्यात दिली आहे. भारताच्या क्लिनिकल चाचणी नोंदीनुसार,या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात 1600 स्वयंसेवक सहभागी झाल्याची माहिती आहे. अहमदाबादमधील कॅडिला हेल्थकेअरची सध्या नऊ ठिकाणी 1000 हून अधिक स्वयंसेवकांवर दुसऱ्या टप्प्याची चाचणी सुरु आहे. तर डॉ. रेड्डीज लॅब लवकरच रशियामध्ये विकसित केलेल्या स्फुटनिक व्ही लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात करणार आहे. बायोलॉजिकल ईने देखील काही दिवसांपूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील एकत्रित चाचणी सुरु केली आहे. कोणत्या भारतीय लसीच्या चाचणीची घोषणा झाली असून लवकर चाचण्या कोणत्या लसीच्या पूर्ण होऊ शकतात ?\ अजूनपर्यंत कोणत्याही भारतीय कंपनीने आपल्या लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्याचा दावा केलेला नाही. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीच्या दुसऱ्या टप्प्याचा डेटा डिसेंबरमध्ये येणे अपेक्षित आहे. जर हा डेटा सकारात्मक आला तर सिरम इन्स्टिट्यूट कोविशील्ड या लसीसाठी लवकर मान्यता मिळवू शकतो. सिरम आयसीएमआर आणि भारत बायोटेक आणि आयसीएमआर लवकरच आपल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण करू शकतात. लसीकरणामध्ये मुख्य अडथळे कोणते आहेत ? सर्वात मोठी समस्या या लस वितरित कशा करायच्या ही आहे. मोठ्या प्रमाणात ही लस वितरित करायच्या असल्याने यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे. शेवटच्या ठिकाणापर्यंत ही लस पोहोचवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता भासणार आहे. त्याचबरोबर रेल्वे, विमान आणि ट्रकमधून देखील याची वाहतूक करताना कोल्ड स्टोरेजची गरज भासणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात स्टोरेजची सुविधा उभी करणे सरकारपुढे आव्हान आहे. त्याचबरोबर ही लस प्रभावी राहण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कोल्ड स्टोरेजमध्येच ठेवाव्या लागणार आहेत. याचबरोबर ही लस घेण्यासाठी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सुया, कापूस आणि अल्कोहोल स्वॅब लागणार आहेत. त्याचबरोबर ही लस साठवण्यासाठी विशिष्ट तापमानाची गरज आहे. हे थंड तापमान तयार करणे सर्वात मोठे संकट आहे. सध्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लसीला तसेच ऑक्सफोर्ड लस आणि जॉन्सन अँड जॉन्सन - बायोलॉजिकल ई लसीसाठी 2-8 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज आहे. दुसरीकडे, Sputnik V, मॉडर्ना आणि फायझर-बायोटेक Pfizer लस वाहतुकीदरम्यान -18, -20 आणि -70 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवण्याची गरज आहे. मॉडर्नाची लस रेफ्रिजरेटरच्या तापमानात 30 दिवस ठेवली जाऊ शकते.
    First published:

    Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या