नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा (Corona virus) एक नवीन प्रकार (न्यू कोरोना व्हेरिएंट B.1.1.529) आढळून आला आहे. यामुळे कोरोनाचा जास्त वेगाने संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनाने गुरुवारी या व्हेरिएंटची 22 रुग्णांना लागण झाल्याची माहिती दिली. इंपीरियल कॉलेज लंडनचे विषाणूशास्त्रज्ञ डॉ. टॉम पीकॉक यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या ट्विटर खात्यावर विषाणूच्या नवीन प्रकाराविषयी माहिती पोस्ट केली (b.1.1.529) होती. तेव्हापासून शास्त्रज्ञ या प्रकाराचा शोध घेत आहेत. हा नवीन प्रकार कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक प्रोफेसर तुलिओ डी ऑलिव्हिरा म्हणाले, 'हा एक अतिशय वेगळ्या प्रकारचा उत्परिवर्ती विषाणू आहे, जो वेगाने पसरू शकतो. या विषाणू प्रकारामुळे पुन्हा भीतीदायक वातावरण तयार झाले असून त्याची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत. अहवालानुसार, 30 हून अधिक उत्परिवर्तनांसह एक नवीन कोविड प्रकार दक्षिण आफ्रिकेत पसरत आहे.
दरम्यान, ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सहा आफ्रिकन देशांची उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, या देशांना रेड लिस्टमध्ये समाविष्ट केले जाईल. तसेच, ब्रिटनमधील प्रवाशांना क्वारंटाईन करावे लागेल.
डेटा आता मर्यादित
प्रोफेसर एड्रियन पुरेन, कार्यवाहक कार्यकारी संचालक, NICD, म्हणाले की, “दक्षिण आफ्रिकेत एक नवीन प्रकार आढळून आला आहे, हे फारसे आश्चर्यकारक नाही. आत्तापर्यंत डेटा मर्यादित असला तरी, आमचे तज्ञ कोरोनाचे नवीन प्रकार समजून घेण्यासाठी सर्व स्थापित मॉनिटरिंग सिस्टमसह सतत कार्य करत आहेत. कोरोनाच्या प्रकारांमुळे अनेक देशांमध्ये संसर्गाची नवीन लाट दिसून आली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा निर्बंध वाढवले जाऊ शकतात.
हाँगकाँगमध्येही नवीन प्रकार आढळला
दक्षिण आफ्रिकेतून हाँगकाँगला पोहोचलेल्या लोकांमध्येही या प्रकाराचा संसर्ग आढळून आला आहे. नवीन प्रकार प्रथम रीगल विमानतळ हॉटेलमध्ये थांबलेल्या दोन लोकांमध्ये आढळून आला. हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शन (CHP) नुसार, तपासात असे दिसून आले आहे की दोन्ही प्रकरणे B.1.1 ची आहेत. पहिल्या व्यक्तीने एअर व्हॉल्व्ह असलेला मास्क घातला होता आणि या मास्कमुळेच दुसऱ्या व्यक्तीमध्ये विषाणूचा संसर्ग झाला होता.
हे वाचा - ब्रेकिंग : मार्च महिन्यात राज्यातील आघाडी सरकार कोसळणार अन् भाजपचं सरकार येणार, नारायण राणेंचा दावा
भारतातील स्थिती काय?
No case of COVID19 variant B.1.1.529 has been reported in India so far: Official Sources
— ANI (@ANI) November 26, 2021
भारतातील सर्व विमानतळांना हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने राज्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे. मात्र, भारतात याबाबत कोणताही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नसून भारतात अद्याप या व्हेरिएंटचे रुग्ण सापडलेले नाहीत. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus