मुंबई, 27 एप्रिल : कोरोनाची (Coronavirus) तिसरी लाट ओसरली आणि त्यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा वेगाने सुरू आहे. एकूणच परिस्थिती पाहता राज्य सरकारने (Maharashtra Government) गुढीपाडव्यापासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात सुद्धा आले. मात्र, आता पुन्हा मास्क सक्ती (Mask compulsory) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या टास्क फोर्सची एक बैठक पार पडली असून तसा प्रस्ताव टास्क फोर्सने दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या काल राज्यातील टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे करावे अशी भूमिका टास्क फोर्स ने मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये.
आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील मुख्यमंत्री यांची व्हीसीच्या माध्यमातून बैठक होणार आहे. या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. इतर राज्यात कोरोना रूग्णं संख्या वाढत असल्याने महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क झालं आहे.
वाचा : 90% किडनी खराब झाल्यावर लोक डॉक्टरांकडे जातात; अगोदरच ही टेस्ट केलेली शहाणपणाचं!
या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावावे की नाहीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता बंदिस्त असलेल्या परिसरात मास्क सक्ती अनिवार्य करण्याची तसेच मॉल्स, नाट्यगृह, थिएटर्समध्ये मास्क सक्ती लागू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. आता या शिफारसीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पहावं लागेल.
मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या शंभरी पार
मुंबईतही कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत म्हणजेच 26 एप्रिल रोजी 102 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 85 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत एकूण 549 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 9515 दिवस इतका आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Face Mask, Maharashtra News