मुंबई, 09 फेब्रुवारी : राज्यात कोरोनाव्हायरसचा (coronavirus) सर्वात पहिला रुग्ण आढळला तो पुण्यात. त्यापाठोपाठ मुंबईतही कोरोनानं शिरकाव केला. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी कोरोनानं आपले हातपाय इतक्या प्रमाणात पसरले की सर्वांचं लक्ष तिथंच गेलं. आतापर्यंत मुंबई, पुण्यातच कोरोनाच्या सर्वाधिक प्रकरणांची नोंद होत असल्याचं दिसून आलं. पण नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मुंबई, पुणे नव्हे तर आता राज्यातील एक छोटासा जिल्हा कोरोनाचा नवा हॉस्पॉट बनला आहे. या छोट्याशा जिल्ह्यावर कोरोनासह बर्ड फ्लू असं दुहेरी संकट आहे. राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार नंदुरबार, सातारा, अमरावती, नागपूर, नाशिक ही पाच ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. यामध्ये सर्वाधिक प्रकरणं नंदुरबारमध्ये आहेत. कोरोना पॉझिटिव्ही रेट हा नंदुरबारमध्ये 10 टक्के, साताऱ्यात 9 टक्के, नागपुरात 8.5 टक्के आणि नाशकात 7.6 टक्के आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून कोरोना रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. 1 फेब्रुवारी रोजी हे प्रमाण 22 टक्के होतं तर आता सोमवारी ज्या 419 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 235 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे हे प्रमाण 56 टक्क्यांवर गेलं आहे. शहरातील नागरिक कोरोना नियमाचं पालन करत नाही आहेत. या पार्श्वूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. हे वाचा - धक्कादायक माहिती : लस घेतल्यानंतरही अमरावती जिल्ह्यात 19 जणांना कोरोनाची लागण कोव्हिड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं की, दिल्लीच्या केंद्रीय पथकाबरोबर आमची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी 10 ते 14 जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं नमूद केलं. ज्यात अमरावती अकोला याबद्दल विशेष चिंता व्यक्त केली आहे. हा अहवाल आम्ही पाहिला आहे. काही ठिकाणी सरळ आकडेवारी पाहण्यापेक्षा दशलक्ष लोकसंख्येपैकी किती याचा विचार व्हायला हवा. या ठिकाणी टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि उपचारातील प्रोटोकॉलमध्येही सुधारणा करून त्याबाबत अधिक प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असं या पथकानं सांगितल्याचं डॉ. ओक म्हणाले. नंदुरबारवर कोरोनासह बर्ड फ्लूचंही थैमान कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट सर्वाधिक असलेल्या नंदुरबारमध्ये कोरोनाचं संकट कमी की काय त्यात बर्ड फ्लूचंही संकट आहे. राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झालेल्या क्षेत्रातील एकूण 2,06,441 कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये फक्त नंदूरबारमधीलच 1,19,773 पक्ष्यांचा समावेश आहे. हे वाचा - बापरे! हे हृदय आहे की दगड; पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का बर्ड फ्लूचं संक्रमण आढळलेल्या या क्षेत्राला नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय या क्षेत्रापासून, पोल्ट्री फार्मपासून एक किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य आणि विष्टा शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.