नागपूर, 30 जानेवारी : मागच्या काही महिन्यांपासून राज्यात हैदोस घातलेल्या कोरोनाचा (Corona Virus) वेग मंदावला आहे. राज्यातली दोन मोठी शहरं असलेल्या नाशिक (Nashik) आणि नागपूरची (Nagpur) कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे, त्यामुळे मेरी, समाजकल्याण पाठोपाठ आता जिल्ह्यातील जम्बो कोव्हिड सेंटरही बंद झाले आहे. 325 खाटांच्या ठक्कर डोम कोव्हिड सेंटरला महापालिकेने टाळे ठोकले आहे.
तर दुसरीकडे नागपूर शहरात पहिल्यांदाच जुलै महिन्यानंतर शुक्रवारी एकही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे वर्षभरापासून कोरोनाच्या धास्तीत असलेल्या नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. काल ३२५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या १३३६७०, तर मृतांची संख्या ४१५० वर पोहोचली. २९२ रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९४.४२ टक्क्यांवर पोहोचले.
राज्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर ही संख्या झपाट्याने वाढत गेली. देशभरामध्ये महाराष्ट्रातच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले, तसंच कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रातच झाले आहेत. त्यानंतर आता जानेवारी महिन्यापासून आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस द्यायला सुरूवात झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid19, Nagpur