मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

देशात पुन्हा कोरोनाची भीती, अचानक रुग्णसंख्या वाढल्याने 5 राज्यांना अलर्ट जारी

देशात पुन्हा कोरोनाची भीती, अचानक रुग्णसंख्या वाढल्याने 5 राज्यांना अलर्ट जारी

corona

corona

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अनेक राज्यांनी निर्बंध हटवले आहेत. सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत; पण याचदरम्यान कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

नवी दिल्ली, 9 एप्रिल : गेल्या दोन वर्षांपासून जगभरातले अनेक देश कोरोनाचा (Corona) सामना करत आहेत. भारतदेखील (India) या स्थितीला अपवाद नाही. जगभरात आतापर्यंत कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, डेल्टाप्लस, ओमिक्रॉन आदी व्हॅरिएंट्स (Variant) आढळून आले आहेत. भारतात तिसऱ्या लाटेनंतर (Third Wave) कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचं चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अनेक राज्यांनी निर्बंध हटवले आहेत. सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत; पण याचदरम्यान कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या कोरोनामुळे चीन (China) आणि अमेरिकेतली (America) स्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) पाच राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यातच गुजरातमध्ये कोरोनाच्या एक्स ई (XE) आणि एक्स एम (XM) व्हॅरिएंटचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने गांभीर्याने चाचण्या (Testing) कराव्यात अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याविषयीचं वृत्त `दैनिक भास्कर`ने प्रसिद्ध केलं आहे.

सध्या चीनमध्ये कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये लॉकडाउन किंवा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अमेरिकेतही रुग्णसंख्या वाढत आहे. ही स्थिती बघता, भारताच्या आरोग्य मंत्रालयाने पाच राज्यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांच्या सरकारला पत्र पाठवलं असून, संसर्ग वाढत असल्यानं चाचण्या गांभीर्यानं करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, गुजरातमध्ये कोरोनाच्या एक्सई व्हॅरिएंटचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आला आहे. तसंच तिथे एक्सएम व्हॅरिएंटचाही एक रुग्ण आढळल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईतल्या (Mumbai) एक महिलेला एक्सई व्हॅरिएंटचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली होती; पण आरोग्य मंत्रालयाने याचा इन्कार केला आहे. हा नवा एक्सई व्हॅरिएंट हा दहा पट वेगानं पसरतो. या व्हॅरिएंटचा पहिला रुग्ण 19 जानेवारी 2022 रोजी ब्रिटनमध्ये आढळून आला होता. आतापर्यंत या व्हॅरिएंटचे 650 रुग्ण आढळून आले आहेत.

देशात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे; पण दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम आणि केरळ या राज्यांमध्ये गेल्या सात दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट अचानक वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा-कोरोनाच्या XE व्हेरिएंटची 'या' राज्यात एन्ट्री, आढळला रुग्ण

केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितलं, `या पाच राज्यांमध्ये दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) वाढत आहे. याचाच अर्थ दररोज नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे या राज्यांच्या सरकारने परिस्थितीचा गांभीर्यानं आढावा घ्यावा आणि गरजेनुसार, कोविड-19 च्या नव्या गाइडलाइन्स (Guideline) जारी कराव्यात.`

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासांत केरळमध्ये 353, महाराष्ट्रात 113, हरियाणामध्ये 336 आणि मिझोराममध्ये 123 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशाचा विचार करता मागील 24 तासांत 1109 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (7 एप्रिल) देशभरात 1033 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. भारतात आतापर्यंत 4 कोटी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 5 लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या तरी कोरोनावर लसीकरण (Vaccination) हाच प्रमुख उपाय आहे. प्रीकॉशन डोस (Precaution Dose) हा कोरोना लशीचा तिसरा डोस आहे. जगभरात कोविड-19 चे नवे व्हॅरिएंट्स आढळून आल्यानंतर या डोसची गरज भासू लागली. भारतात या वर्षी 10 जानेवारीला फ्रंटलाइन वर्कर्स आणि गंभीर आजार असलेल्या 60 वर्षांवरच्या वयोगटातल्या व्यक्तींना बूस्टर डोस (Booster Dose) देण्यास सुरुवात झाली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात कोविड-19 च्या लसीकरणाचा आकडा आता 185.53 कोटींवर पोहोचला आहे. शुक्रवारी (8 एप्रिल) संध्याकाळी सात वाजेपर्यंत लशीचे 12 लाखांहून अधिक डोसेस देण्यात आले. तसंच 12 ते 14 वयोगटातल्या मुलांना लशीचे 2.16 कोटींहून अधिक डोसेस देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटचा धोका लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने याला प्रीकॉशन डोस असं नाव दिलं आहे. 18 वर्षांवरच्या सर्वांना 10 एप्रिलपासून कोरोना लशीचा तिसरा डोस देण्याची घोषणा सरकारने केली. आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना हा डोस मोफत दिला जाणार आहे. अन्य प्रौढ व्यक्तींना या डोससाठी शुल्क द्यावं लागणार आहे. हा डोस खासगी लसीकरण केंद्रांवरही देण्यात येईल. ज्यांचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि ज्यांनी लशीचा दुसरा डोस 9 महिन्यांपूर्वी घेतला होता, त्यांनाच हा प्रीकॉशन डोस देण्यात येणार आहे.

First published:

Tags: Corona, Corona spread, Coronavirus cases, Covid cases, Gujrat