...तर विमान प्रवास बाजारात जाण्यापेक्षा सुरक्षित; कोरोना काळात अभ्यासातून समोर आली माहिती

...तर विमान प्रवास बाजारात जाण्यापेक्षा सुरक्षित; कोरोना काळात अभ्यासातून समोर आली माहिती

कोरोना (Corona)काळात सर्व प्रोटोकॉल पाळले तर, सामान खरेदीपेक्षा विमान प्रवास अधिक सुरक्षित आहे असं अभ्यासकांचं मत आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर: कोरोना विषाणू (CoronaVirus)मुळे संपूर्ण जगातली जीवनशैलीच बदलली. या भयंकर विषाणूपासून बचावासाठी काही सार्वजनिक प्रोटोकॉल जगभर पाळले जात आहेत. तोंडावर मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, वारंवार सॅनिटायझरनी हात धुणं हे प्रोटोकॉल अंगी बाणवायला सुरुवात करून आता वर्ष उलटत आलं. याच काळात जसं कोरोनाची लस शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे तसंच माणसांच्या वागण्यासंबंधीही वेगवेगळे अभ्यास व संशोधनं केली जात आहेत. त्यापैकी एका अभ्यासात असं लक्षात आलं आहे की, सार्वजनिक वर्तनाचे जे कोविडसंबंधी प्रोटोकॉल आहेत ते काटेकोरपणे पाळले गेले तर बाहेर रेस्टॉरंटमध्ये खायला किंवा किराणा माल खरेदीला जाणं याच्या तुलनेत विमानानी प्रवास करणं कमी धोकादायक आहे. म्हणजे कोरोना विषाणू संसर्ग होण्याची शक्यता विमान प्रवासात कमी आहे.

तुम्हाला स्वाभाविक वाटेल की किराणा खरेदीला जाणं आणि विमान प्रवास यांची तुलना कशाला करायची. त्यामागेही एक महत्त्वाचं कारणं आहे ते म्हणजे, हा अभ्यास काही विमान वाहतूक कंपन्या, विमान उत्पादक कंपन्या आणि एअरपोर्ट चालवणाऱ्या कंपन्यांनी आर्थिक निधी देऊन करून घेतला आहे. सध्या कोरोनाच्या धास्तीमुळे विमान प्रवासाचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे विमान कंपन्यांना ग्राहक आकर्षित करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने ‘Aviation Public Health Initiative’ हा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, कोव्हिडसंबंधी सर्व प्रोटोकॉलचं पालन केलं तर बाजारात सामान खरेदीला गेल्यामुळे कोरोना होण्याचा धोका अधिक असून, तुलनेने विमान प्रवासात कोरोना संक्रमण होण्याचा धोका कमी आहे. कोविड-19 चे प्रोटोकॉल आणि फेसमास्क वापरणं, हात धुणं इ. नॉन-फार्मास्युटिकल पद्धतींनी घेतली जाणारी काळजी ही भयानक कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी किती महत्त्वाची आहे. हे सिद्ध करणं हा हार्वर्डच्या या अभ्यासाचा मूळचा हेतू होता.

या अभ्यासानुसार, जर दिलेली सगळी मार्गदर्शक तत्त्वं योग्य पद्धतीने पाळली गेली तर कोरोना काळात केल्या जाणाऱ्या सामान खरेदी किंवा हॉटेलात खाणं यासारख्या दैनंदिन व्यवहारांच्या तुलनेत विमानातून प्रवास करताना SARS-CoV-2 विषाणूचं संक्रमण होण्याचा धोका कमी आहे.

‘विमान वाहतूक कंपन्या आणि विमानतळांवर प्रवाशांच्या जागृतीसाठी प्रवासात संक्रमण टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती देणारी अभियानं राबवली जातायत. चेक-इन, बोर्डिंग आणि विमान प्रवासादरम्यान सार्वजनिक आरोग्य सुरक्षेचं भान कसं राखावं. हेही यात सांगितलं जात आहे. केबिन क्रूला एखादा रुग्ण ओळखणं. आणि तसा रुग्ण विमानात सापडलाच तर त्याला आयसोलेट कसं करायचं याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे,’ असं या अभ्यासात म्हटलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 31, 2020, 6:38 PM IST
Tags: corona

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading