नवी दिल्ली, 25 मार्च : जगभरात कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत असतानाच आता कोविड-19 च्या नव्या केसेस वाढू लागल्या आहेत. जगभरातील कोरोना निर्बंध आता शिथिल होत असल्याने कोरोनाची वैश्विक साथ (Covid-19 Pandemic) आता आटोक्यात आली, असं वाटत आहे. पण आता कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट येतं आहे (Corona 4th wave in India). महाराष्ट्रासह सात राज्यांना सर्वाधिक धोका आहे.
कोरोनाचा एक नवा प्रकार, नवा व्हेरियंट आलेला आहे. कोरोनाची चौथी लाट येण्यामागे हा व्हेरियंट कारण ठरू शकतो, असा इशारा दिला जात आहे. कोविड -19च्या या नव्या व्हेरियंटचं नाव डेल्टाक्रॉन आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्हीची लक्षणं असलेला हा नवा व्हेरियंट या शब्दांच्या संगम होऊन तयार झालेला आहे. काळजीची बाब म्हणजे भारतात हा व्हेरियंट दाखल झाला आहे आणि सात राज्यांत त्याचे रुग्णही मिळालेले आहेत. या राज्यांमध्ये कर्नाटक, तमीळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि दिल्लीचा समावेश आहे. सध्या या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) या रिकॉम्बिनंट व्हेरियंटमागचं कारण सांगताना म्हटलं आहे की, ओमिक्रॉन आणि डेल्टा ज्या वेगाने पसरले होते, त्यामुळे ही स्थिती येणं तर अपेक्षित होतंच.
काय आहे डेल्टाक्रॉन?
ओमिक्रॉन आणि डेल्टा या कोरोना च्या उपप्रकारांची एकत्रित लक्षणं असलेला डेल्टाक्रॉन हा एक रिकॉम्बिनंट व्हेरियंट आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये डेल्टाक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. पॅरिसमधील (Institute Pasteur) इन्स्टिट्युट पाश्चरमधील शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा एक नवा व्हेरियंट पाहिला होता जो आधीच्या व्हेरियंटपेक्षा पूर्ण वेगळा होता. हा डेल्टाक्रॉनचा नमुना उत्तर फ्रान्समधील एका ज्येष्ठ व्यक्तीकडून आला होता. त्याची तपासणी केल्यानंतर हा व्हेरियंट फार वेगळा वाटला. त्यातील अधिकांश जेनेटिक्स हे कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटसारखे होते. परंतु या व्हेरियंटमधील एक भाग जो विषाणूंचा स्पाईक प्रोटिन कोड भेदून त्याआधारे कोशिकांच्या आत प्रवेश करतो तो मात्र ओमिक्रॉनमधून आलेला आहे. त्यामुळे एकाअर्थी कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन दोन्ही उपप्रकारांचं एक मिश्रण म्हणजे हा नवा डेल्टाक्रॉन आहे.
हे वाचा - शाळा झाल्या सुरू; मात्र विद्यार्थ्यांमध्ये उद्भवलेल्या नव्या त्रासामुळे पालकांसह शिक्षकही चिंतेत
इन्स्टिट्युट पाश्चरमधील शास्त्रज्ञांनी सांगितलं की, यूके आणि यूएसमधील बाधित रुग्णांमधील डेल्टाक्रॉन व्हेरियंटमध्येसुद्धा काही फरक आहे. त्यामुळे त्याची पुढेही काही वेगवेगळी रुपं पाहायला मिळू शकतात.
डेल्टाक्रॉनची मुख्य लक्षणं
अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य सेवेने दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणातून बनलेल्या या डेल्टाक्रॉनची लक्षणंसुद्धा (Symptoms of Deltacron) मागच्या कोरोना महासाथीसारखीच आहेत. पण अजूनही शास्त्रज्ञ याविषयी संशोधन करत आहेत, माहिती गोळा करत आहेत आणि लक्षणांचा शोध घेत आहेत.
डेल्टाला कोरोनाचं आत्तापर्यंतचं सगळ्यात घातक रुप मानलं गेलं आहे. डेल्टाक्रॉन हा डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या संयोगाने तयार झालेला आहे. ज्यामुळे बाधित व्यक्तीला काही सामान्य तर काही गंभीर लक्षणं जाणवू शकतात.
डोकं दुखणं, जबरदस्त ताप येणं, अंगाला घाम येणं, कापरं भरणं, घसा खवखवणं, सतत सर्दी, थकवा, अंगदुखी ही ओमिक्रॉनच्या बीए.2 या व्हेरियंटची लक्षणं आहेत. ओमिक्रॉन बीए.2ची बाकी लक्षणं ताप, सर्दी, घशात खवखव, डोकंदुखी, थकवा आणि हृदयाची धडधड वाढणं ही आहेत.
डेल्टाक्रॉनवर केलेल्या अभ्यासानुसार, या व्हेरियंटची दोन प्रमुख लक्षणं म्हणजे चक्कर येणं आणि थकवा. बाधित झाल्यानंतर 2-3 दिवसांत रुग्णाला ही लक्षणं जाणवायला लागतात. काही रिपोर्ट तर असंही सांगतात की डेल्टाक्रॉनचा परिणाम नाकापेक्षा जास्त पोटावर होतो. त्यामुळे रोग्याला मळमळ, उलट्या, जुलाब, पोटात जळजळ, सूज येणं, अपचन आदी तक्रारी जाणवतात.
हे वाचा - OMG! डॉक्टरांनी महिलेच्या पोटातच शिवला तिचा हात; धक्कादायक आहे कारण
मीडिया रिपोर्टनुसार IHU मेडिटेरियन इन्फेक्शन या फ्रान्समधील संस्थेतील तज्ज्ञ फिलिप कोलसन यांच्या मते, डेल्टाक्रॉन अजूनही जगभरातील अतिशय कमी रुग्णांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे त्याविषयी काही निष्कर्ष काढण्याइतपत पुरेसे नमुने, डेटा अजून उपलब्ध नाही आणि म्हणूनच तो अधिक संसर्गजन्य, अधिक धोकादायक असेल का याबद्दल ठोस माहिती देता येणार नाही.
त्यामुळे जरी आपलं जीवन पूर्वपदावर येत असलं तरीही आपल्याला काळजी घ्यायला हवी हे मात्र पुन्हा अधोरेखित होत आहे. त्यामुळे आपण कोविड-19 विषाणूपासून संरक्षण करणाऱ्या गोष्टींचं पालन करायला हवं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Delta virus, Omicron