नवी दिल्ली, 22 डिसेंबर : कोरोनाचं (coronavirus) संकट रोखण्यासाठी जगभरात विविध टप्प्यात कोरोना लशीची (corona vaccine) चाचणी घेण्यात येते आहे. अनेक स्वयंसेवक (volunteers) त्यासाठी जीव धोक्यात घालून लस टोचून घेत आहेत. पण प्रत्यक्ष लसीकरण सुरू झालं तरी, लहान मुलांना ही कोरोना लस देता येणार नाही, असं नीती आयोगाचे (Niti Aayog) सदस्य व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केलं आहे.
काय आहे लहान मुलांना Covid-19 vaccine न देण्याचं कारण?
नीति आयोगाचे सदस्य वी. के. पॉल यांनी सांगितल्यानुसार, 'लहान मुलांना कोरोना लस देण्याबाबत अजून कुठलीच मार्गदर्शक तत्त्वं आलेली नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बनलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लहान मुलांना ही लस देण्याची गरज नाही. कोरोना लशीची आवश्यकता या रोगाचा फैलाव कमी करण्यासाठी आहे. आजवर या रोगाबाबत हाती आलेली निरिक्षणं पाहता लहान मुलांना लस दिली जावी असं दिसत नाही. आजवर झालेल्या लशींच्य सर्व चाचण्या 18 वर्षांवरील व्यक्तींवर झाल्या आहेत.'
जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबरमध्ये स्पष्ट केल्यानुसार, जगभरात जवळपास 40 कोरोना लशी कुठल्या न कुठल्या टप्प्यात चाचणीत आहेत. त्यातील 10 लशी जवळपास शेवटच्या टप्प्यात पोचल्या आहेत. हा चाचणीचा अंतिम टप्पा लस किती सुरक्षित आहे हे दाखवून देतो. पण यातल्या कुठल्याही लस निर्मात्यांनी लहान मुलांवर आणि गरोदर स्त्रियांवर याची चाचणी केली नाही. त्यामुळे हे दोन गट सोडूनच कोरोनाचं लसीकरण होणार आहे.
दरम्यान डिसेंबरच्या सुरवातीला रशियाच्या Sputnik लशीची दुसरी मानवी चाचणी पुण्यात घेण्यात आली. ही लस रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने तयार केली असली तरी या लसीचं भारतातलं उत्पादन डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेत होतं आहे. या प्रयोगशाळेचं मुख्यालय हैदराबाद इथं आहे.
अमेरिकेच्या मॉडर्ना लसीबाबत ही तिसऱ्या टप्प्यात 94.5 टक्के यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. नॅशनल इन्स्टयुट ऑफ एलर्जी एन्ड इंन्फेक्शिअस डिसीज (NIAID)च्या संशोधकांच्या दाव्यानुसार ही लस टोचून घेतल्यानंतर किमान तीन महिने तरी मानवी शरीरात अॅन्टीबॉडीज निर्माण करते.