नवी दिल्ली, 8 जानेवारी : गेल्या दीड वर्षापासून जगावर कोरोनाचं (Coronavirus) संकट आहे. गेल्या काही महिन्यांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे कोरोनाचं संकट टळलं असं वाटत होतं; मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हॅरिएंट असलेल्या ओमायक्रॉन विषाणूने डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा नवा व्हॅरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने (Omicron) चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग अधिक गतीने होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोना आणि कोरोनाच्या नव्या प्रकारांवर बूस्टर डोस प्रभावी असल्याचं म्हटलं जात होतं; मात्र बूस्टर डोस कोरोनापासून बचाव करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय नसल्याचं ऑक्सफर्डच्या व्हॅक्सिन तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी चौथा डोस घ्यावा लागणार असल्याचंही म्हटलं जात आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ऑक्सफर्डचे लस तज्ज्ञ सर अँड्र्यू पोलार्ड यांनी म्हटलं आहे, की कोरोनाचा सामना करण्यासाठी दर चार-सहा महिन्यांनी नियमित बूस्टर डोस घेणं हे कोरोनापासून बचाव करण्याचं कायमस्वरूपी उत्तर नाही. डेली मेलने पोलार्ड यांच्या हवाल्याने म्हटलं आहे, की दर सहा महिन्यांनी बूस्टर लस देणं चालू ठेवता येऊ शकत नाही. दर चार-सहा महिन्यांनी नागरिकांचं लसीकरण केलं जाऊ शकत नाही. त्याचा जास्त परिणामही होणार नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींवर भविष्यात लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतर काही कालावधीनंतर त्याचा प्रभाव कमी झाला होता. तसंच बूस्टर डोसचा प्रभाव येत्या काही महिन्यांच्या कालावधीत कमी होऊ शकतो. बूस्टर डोसने लोकांना कोरोपासून संरक्षण दिल्याचा डेटा मिळाला, तर आश्चर्यकारक असेल, असं मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफाने बांसेल यांनी म्हटलं आहे. तसंच गेल्या वर्षी ज्यांनी बूस्टर डोस घेतला होता, त्यांना या हंगामात कोरोनापासून काही प्रमाणातच संरक्षण मिळण्याची शक्यता आहे. कारण, अनेक जण थंडीपासून बचाव करण्यासाठी घरामध्ये एकत्र जमतात आणि या काळात संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. असंही ते म्हणाले. हे ही वाचा- भारतातील Omicron रुग्णांमध्ये दिसली ही 5 गंभीर लक्षणं; AIIMS ने केलं अलर्ट स्काय न्यूजने पोलार्ड यांचा हवाला देऊन म्हटलं आहे, की कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातल्या 10 टक्क्यांहून कमी व्यक्तींनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर लशीचा चौथा डोस देण्याची कल्पना अर्थहीन आहे. तसंच भविष्यातल्या लसीकरण मोहिमांमध्ये वयस्कर व्यक्तींऐवजी आरोग्याच्या दृष्टिकोनातून कमजोर असलेल्या व्यक्तींवर लक्ष दिलं पाहिजे. सध्या जगभरात ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार होत असल्याने इस्रायलमध्ये 60पेक्षा जास्त वयोगटातल्या व्यक्तींना चौथा डोस डोस दिला जात आहे. जर्मनी, यूके आणि फ्रान्समधले आरोग्य अधिकारी नागरिकांना दुसरा बूस्टर डोस देण्याची योजना आखत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन केलं पाहिजे. सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि बाहेर पडताना मास्क घालणं या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तसंच कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि खबरदारी बाळगणं आवश्यक आहे..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.