जेरूसालेम, 16 फेब्रुवारी : गेल्या वर्षी कोरोनाने (Coronavirus) जग व्यापून टाकल्यानंतर 2021 ची सुरुवात झाली तिच कोरोना लशीच्या (Corona Vaccine) बातमीने. जगभरात अनेक देशांत लस विकसित करण्याचं काम सुरू होतं. त्यापैकी काही देशांच्या लशींच्या चाचण्यांना मंजुरी मिळाली. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष वापराला परवानगी मिळाली. लस विकसित केलेल्या देशांमधून अन्य देशांना लशींची निर्यात करण्यात आली. आता लसीकरणाचे निष्कर्ष हाती येऊ लागले आहेत. इस्रायलमध्ये वेगाने लसीकरण होत आहे. तिथले निष्कर्षही दिलासादायक आहेत. कोरोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतर देशातील कोरोना प्रकरणं 94 टक्क्यांपर्यंत घटली आहेत. फायझर-बायोएनटेकच्या (Pfizer-BioNTech) लशीचे दोन डोस घेतलेल्यांमध्ये कोविड-19 ची (COVID-19) लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांची संख्या 94 टक्क्यांपर्यंत घटली आहे, असं दिसून आलं आहे. इस्रायलमध्ये (Israel) झालेल्या या ताज्या अभ्यासात असं दिसून आलं आहे, की फायझर-बायोएनटेकने विकसित केलेली कोरोना लस घेणाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसण्याचं आणि गंभीर रुग्ण सापडण्याची शक्यता फार कमी आहे. इस्रायलमध्ये आरोग्यसेवा पुरवणारी क्लॅलिट या सर्वांत मोठ्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला आहे. फायझरने विकसित केलेल्या लशीचे दोन डोस घेणाऱ्या सहा लाख व्यक्तींवर हा अभ्यास करण्यात आला. इस्रायलमध्ये आतापर्यंत करण्यात आलेला कोणत्याही लशीबद्दलचा हा सर्वांत मोठा अभ्यास आहे. हे वाचा - आता जगभरात वापरली जाणार सीरमची कोरोना लस, WHO कडून हिरवा कंदील रॉयटर्सच्या वृत्तानुसार, लस न घेतलेल्यांच्या तुलनेत लस घेणाऱ्या व्यक्तींमध्ये ताप, श्वासोच्छ्वासाला त्रास अशी कोरोनाची लक्षणं (Symptoms) 94 टक्क्यांपर्यंत कमी दिसली. तसंच, हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या, अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या आणि व्हेंटिलेटरची गरज पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये लशीचे दोन डोस दिल्यानंतर 92 टक्के घट झाल्याचं दिसून आलं. डिसेंबर 2020मध्ये फायझर कंपनीकडून सांगण्यात आलं होतं, की त्यांच्या कंपनीने विकसित केलेली लस 95 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचं क्लिनिकल ट्रायल्समध्ये आढळलं आहे. क्लॅलिटने आता केलेल्या अभ्यासातही ती बाब स्पष्ट झाली असून, ही लस सर्वसामान्य नागरिकांवर प्रभावी ठरत असल्याचं दिसत आहे. याबद्दल रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना क्लॅलिटचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर रैन बालिसर यांनी सांगितलं, ज्याप्रमाणे फायझरच्या लशीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये दिसलं होतं, त्याचप्रमाणे या अभ्यासातही दिसून आलं. या लशीच्या दुसऱ्या डोसनंतर त्या लशीचा प्रभाव दिसू लागत आहे. दोन डोस देऊन दोन आठवडे झाल्यानंतर या लशीचा प्रभाव अधिक दिसू लागतो. हे वाचा - राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच आणखी एका मंत्र्याला COVID 19 ची लागण इस्रायलमध्ये आतापर्यंत 28.5 टक्के नागरिकांना कोरोना लशीचे दोन डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.