देशात ज्या महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक कोरोना प्रकरणं होती, तिथं आता नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.
पण आता महाराष्ट्रऐवजी दुसऱ्या राज्यांनी केंद्र सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. या राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्याचा परिणाम आता पाहायला मिळतो आहे.
पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाल्या. कालच या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला.
निकालानंतर अगदी जल्लोषात विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग… सर्रासपणे कोरोना नियमांचं उल्लंघन झालं.
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी केंद्राने देशातील कोरोनाची आकडेवारी जारी केली. 23 राज्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामध्ये निवडणूक झालेल्या पाचपैकी पाचही राज्यांचा समावेश आहे.
निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी या राज्यांमधील कोरोनाची धक्कादायक परिस्थिती समोर येत आहे. विधानसभा निवडणूक झालेल्या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे.
त्यामुळे निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या सरकारसमोर आणि केंद्रासमोरही आता या राज्यातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान आहे.