मुंबई, 27 जून : राज्यात कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं आहेत ती मुंबईत. राज्यातील दैनंदिन नव्या रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण मुंबईतच सापडत आहेत (Mumabi coronavirus cases). अशात आता मुंबई महापालिकेने कोरोनाचा एक रिपोर्ट जारी केला आहे. मुंबईतील कोरोनाच्या जीनोम सिक्वेसिंगचा हा रिपोर्ट आहे. ज्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेसिंगच्या (Mumbai corona genome sequencing) एकूण नमुन्यांपैकी 99.63 टक्के नमुने हे ओमायक्रोनच्या सब-व्हेरिएंटने बाधित असल्याचं समोर आलं आहे (Mumbai Omicron sub variant).
कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत १३ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष समोर आले आहेत. या १३ व्या फेरीतील चाचण्यांसाठी ३६७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २६९ नमुने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे मुंबई महानगर क्षेत्राबाहेरील होते. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २६९ नमुन्यांपैकी २६८ अर्थात ९९.६३% नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे, तर एक नमुना हा इतर उपप्रकाराने बाधित आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
१३ व्या फेरीतील या चाचण्यांचे विविध परिमाणांच्या आधारे करण्यात आलेले मुद्देनिहाय विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
१३ व्या फेरीतील २६९ चाचण्यांचे वयोगटानुसार विश्लेषण
• ० ते २२ या वयोगटात ३३ जण (१२ टक्के) ओमायक्रॉन बाधित तर १ जण इतर उपप्रकाराने बाधित
• २१ ते ४० या वयोगटातील १०८ रुग्ण (४० टक्के) ओमायक्रॉनने बाधित
• ४१ ते ६० या वयोगटात ५५ रुग्ण (२१ टक्के) ओमायक्रॉनने बाधित
• ६१ ते ८० या वयोगटातील ५१ रुग्ण (१९ टक्के) ओमायक्रॉनने बाधित
• ८१ ते १०० या वयोगटातील २१ रुग्ण (८ टक्के) ओमायक्रॉनने बाधित
• चाचण्या करण्यात आलेल्या २६९ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील २९ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ८ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ६ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर १५ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोविड विषाणुच्या उप प्रकाराने बाधित आढळून आले. तथापि, या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
२६९ चाचण्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरणानुसार विश्लेषण लक्षात घेता
• २६९ पैकी ८ रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती. पैकी २ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
• लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १५४ रुग्णांपैकी ३१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णास अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले.
• एकूण २६९ रुग्णांपैकी १०७ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी २२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर ५ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले. एका रुग्णाला वैद्यकीय प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करावा लागला. रुग्णालयात दाखल या २२ पैकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला. या तीनही रुग्णांना सहव्याधी देखील होत्या.
• ओमायक्रोन या उप प्रकाराने २६८ बाधित रुग्णांपैकी बी.ए.४ चे ६ आणि बी ए.५ व्हेरियंटचे १२ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण ३ जून ते १६ जून २०२२ या कालावधीतील आहेत. त्यातील एक १६ वर्षाची मुलगी तर २ पुरुष व २ महिला या ८० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आहेत. हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत.
• बी.ए.४ व्हेरियंटच्या ६ रुग्णांपैकी ४ जणांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत तर उर्वरित दोघांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही व या दोन्ही रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते.
• बी ए.५ व्हेरियंटच्या १२ रुग्णांपैकी ७ जणांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत तर ५ जणांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही. या ५ पैकी एका रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते.
हे वाचा - Diabetes च्या भीतीने तुम्ही साखर खाणंच सोडलंत; पण याचेही होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
दरम्यान, विविध उप प्रकारातील कोविड विषाणुची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने मुखपट्टी अर्थात ‘मास्क’चा सुयोग्य वापर, दोन किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai